Pm Modi Viral Photo: इंडोनेशियाच्या बाली शहरात नुकत्याच झालेल्या G-20 परिषदेत (G-20 Summit) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची ठाम भूमिका चर्चेत होती. याची चर्चा जगभर सुरू होती. खुद्द व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे (Karine Jean-Pierre) यांनीही मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांची भेट आणि दोघांमधील सुसंवादाची कबुली दिली. आपल्या निवेदनात जीन-पियरे म्हणाले, “भारत आणि आमच्यातील नाते अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही राष्ट्राध्यक्ष बायडेन पंतप्रधान मोदींना अभिवादन करताना आणि भेटताना पाहिलेच असेल. हे एक महत्त्वाचे नाते आहे ज्याचा आम्ही खरोखर आदर करतो.” पण सध्या मात्र पंतप्रधान मोदींचा त्याच शिखर संमेलनातील एक फोटो व्हायरल होत असून त्यावर भाजपा नेत्यानेच त्यांना घरचा आहेर दिला आहे.
भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचा फोटो ट्विट करत अमेरिकन अधिकारी मोदींची खिल्ली उडवत असल्याचे म्हटले आहे. छायाचित्रात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आपला हात भारतीय पंतप्रधानांच्या मानेवर ठेवत आहेत. याबाबत स्वामी यांनी लिहिले, "हा फोटो मॉर्फ केलेला आहे की खरा? (या फोटोवरून) खाजगीत अमेरिकन अधिकारी मोदीजी किती खोटे आहेत हे सांगत त्यांची टिंगलटवाळी करत आहेत. भारतीयांना हे ऐकून नक्कीच वाईट वाटते. त्यामुळे मोदींनी फोटो काढण्याची हाव आता थांबवली पाहिजे कारण तेच आता बूमरँग होत आहे," असे त्यांनी ट्विट केले.
दरम्यान, सुब्रमण्यम स्वामींच्या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या @ActiveBread ने लिहिले, “प्रामाणिकपणे सांगायचे तर हे जगच बनावट आहे. मोठा विचार करा, तुमच्यासारख्या लाखो हृदयांचा आत्मा असलेल्या नेत्यावर कधीही टीका करू नका." @MoneyMike7211 ने लिहिले, "तुम्ही अमेरिकन लोकांबरोबर वास्तव्यास आहात का?" @basabchatterje6 म्हणाले, "अमेरिकन तुम्हाला सर्व टिंगल-टवाळींची माहिती देत असतात वाटतं." @mepratap म्हणाले, "सर, आम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव आहे, तुम्हाला (असे ट्विट करून) आठवण करून देण्याची गरज नाही." तर @upwalarajput लिहिले, "ते लोक अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या इटालियन लोकांबद्दल बोलत असावेत."