नवी दिल्ली - कर्नाटकातील काँग्रेस आमदार बी नारायण राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नामर्द असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. सोमवारी (18 मार्च) कलबुर्गी येथील प्रचार सभेत मोदींवर टीका करत असताना काँग्रेस आमदाराची जीभ घसरली आहे.
'नरेंद्र मोदी नामर्द आहेत, त्यांचे लग्न लावता येईल पण त्यांच्याकडून पूत्रप्राप्ती होणार नाही' असे वादग्रस्त विधान आमदार बी नारायण राव यांनी केले आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे काम करणारे पंतप्रधान नाहीत, ते खोटे बोलणारे पंतप्रधान आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली. कलबुर्गी येथे राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी राहुल गांधी यांच्या आगमनापूर्वी बी नारायण राव यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
चौकीदार नाही चोरच, हे जनतेने ओळखले आहे, राहुल गांधी यांची मोदींवर टीका
स्वत:ला चौकीदार म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधान मोदी यांची स्वत:ची चोरी पकडली जाताच, आता ते सारे भारतीयच चौकीदार असल्याचे सांगू लागले आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी (18 मार्च) कर्नाटकातील जाहीर सभेत केली. मोदी यांनी स्वत:ला किती चौकीदार म्हणवून घेतले, तरी ते चोर असल्याचे प्रत्येक भारतीयाने ओळखले आहे, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांना पंतप्रधान होताच मोदी यांनी स्वत:ला ‘चौकीदार’ म्हणवून घेत प्रत्यक्षात मात्र काही ठरावीक श्रीमंतांची चौकीदारी करण्यास सुरुवात केली. पंतप्रधान मोदी केवळ चोरच नाहीत, तर ते खोटेही बोलतात. दरवर्षी तरुणांसाठी दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अशी अनेक आश्वासने त्यांनी दिली, पण तीही खोटी ठरल्याचे भारतीय जनतेने ओळखले आहे असं म्हटलं होतं.
'मोदींचा (Modi) अर्थ' मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय, काँग्रेस प्रवक्त्यांचे वादग्रस्त विधानकाँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान मोदीं (Modi) चा अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय असा असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. पवन खेडा यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटरवर मोदींबद्दल केलेल्या विधानाचा मुद्दा उचलत ट्वीट केले होते. पवन खेडा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ भाजपाने पोस्ट केला होता.
MODI यांचा अर्थ मसूद अजहर, ओसामा, दाऊद आणि आयएसआय असा आहे असं एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान पवन खेडा यांनी म्हटलं होतं. भाजपाकडून पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा देखील चर्चेत सामील झाले होते. 'देशाच्या पंतप्रधानांची तुलना तुम्ही ओसामा बिन लादेनसोबत कशी करू शकता? असा प्रश्न उपस्थित करत पवन खेडा यांनी माफी मागावी' अशी मागणी संबित पात्रा यांनी केली. पवन खेडा यांच्या वादग्रस्त विधानावर नेटीझन्सनी नाराजी व्यक्त केली होती.