Pm Modi Story Narration to Orphans: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेऊन ८ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या सरकारच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त, पंतप्रधान मोदींनी पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम कोरोनाच्या काळात अनाथ झालेल्या मुलांना हस्तांतरित केली. यावेळी, मोदींनी वचनही दिले की जर एखाद्या मुलाला व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची गरज भासली तर पीएम केअर्स त्यासाठी मदत करण्यास सक्षम असेल. याच कार्यक्रमादरम्यान मोदींनी त्या मुलांना आपल्या आजीची गोष्ट सांगितली.
मोदींनी कोरोनाच्या काळात अनाथ झालेल्या मुलांना पत्र लिहून त्यांच्या आजीची एक गोष्ट सांगितली. त्यांनी पत्रात लिहिले की, "आजच्या दिवशी (२७ मे) सुमारे १०० वर्षांपूर्वी माझ्या कुटुंबालादेखील अशाच एका दु:खाला सामोरं जावे लागले. एका शतकापूर्वी जेव्हा संपूर्ण जग आजच्यासारख्या साथीच्या आजाराच्या विळख्यात होते, तेव्हा माझ्या आईने तिची आई (मोदींची आजी) गमावली. माझी आई इतकी लहान होती की तिला तिच्या आईचा चेहराही नीट आठवत नाही. त्यामुळे माझ्या आईला तिच्या बालपणी आईची माया मिळू शकली नाही. म्हणूनच आज मी तुमच्या मनातील व्यथा, तुमच्या आतील दु:ख समजू शकतो. पालकांची माया मुलांसाठी नेहमीच आधार असते. तुमच्या पालकाने तुम्हाला आत्तापर्यंत योग्य आणि अयोग्य, चांगले आणि वाईट यातील प्रत्येक फरक सांगितले आणि मार्गदर्शन केले. पण आज जेव्हा ते तुमच्यासोबत नाहीत, तेव्हा तुमच्या जबाबदाऱ्या अधिकच वाढतात."
मोदींनी पुढे पत्रामधून अनाथ झालेल्या मुलांना आश्वासनही दिले, “तुमच्या आयुष्यातील ही पोकळी भरून काढणे कोणालाही शक्य नाही. पण तुमचे कुटुंब या नात्याने मी तुम्हाला सांगतो की तुमच्या संघर्षात, तुमच्या अडचणीत, तुमच्या सुख-दु:खात तुम्ही एकटे नाही. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. मी तुमच्याशी पंतप्रधान म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून बोलत आहे. 'पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन' द्वारे आयुष्मान हेल्थ कार्डदेखील मुलांना दिले जात असून ते ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा देखील प्रदान करेल", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.