N फॉर न्यू इंडिया, D फॉर.., मोदींनी सांगितला NDAचा अर्थ; म्हणाले, 'ते' कार्यकर्त्यांचेही होऊ शकत नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 10:58 PM2023-07-18T22:58:10+5:302023-07-18T22:58:46+5:30
यावेळी मोदींनी एनडीएचे महत्त्व सांगतानाच, घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर प्रहार करत, विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी एनडीएचा फूल फॉर्मदेखील सांगितला.
एनडीएच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटक पक्षांना संबोधित केले. यावेळी त्यांनी एनडीएचे महत्त्व सांगतानाच, घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर प्रहार करत, विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी एनडीएचा फूल फॉर्मदेखील सांगितला. मोदी म्हणाले, एन फॉर न्यू इंडिया, डी फॉर डेव्हलप्ड नेशन आणि ए फॉर एस्पिरेशन ऑफ पीपल ऑफ इंडिया.
जवळ येऊ शकता, सोबत नाही...-
मोदी म्हणाले, "हे पक्ष का एकत्र येत आहेत? जनता सर्व पाहत आहे. पक्षांना जोडणारा धागा काय आहे? वैयक्तिक स्वार्थासाठी मूल्यांशी तडजोड केली जात आहे. केरळमध्ये डावे आणि काँग्रेस एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले असल्याचे लोक पाहत आहेत. तर बंगळुरूमध्ये त्यांचे नेते एकत्र बसून हसत आहेत. बंगालमध्ये डावे, काँग्रेस आणि तृणमूल यांच्यातील संघर्ष सर्वांनाच माहीत आहे. ते त्यांच्या राजकीय हितासाठी जवळ येऊ शकतात, पण सोबत येऊ शकत नाहीत, असेही मोदी म्हणाले. ते त्याच्या कार्यकर्त्यांचेही होऊ शकत नाहीत. या पक्षांचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. एवढेच नाही, तर हे लोक मोदीच्या बाबतीत एवढा विचार करतात, त्यांनी देशाच्या बाबतीत एवढा विचार करायला हवा होता.
निवडणुकीसंदर्भात काय म्हणाले मोदी?
2024 ला होणाऱ्या निवडणुकीसाठी बोलताना मोदी म्हणाले, निवडणूका जवळ येत आहेत आणि देशातील जनतेने एनडीएला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. देशच नाही तर परदेशातही हा आवाज ऐकू येतो आहे. जे सरकार जाणार असते, त्याच्यासोबत परकीय सरकारे वेळ घालवत नाहीत. मात्र, सर्व देश भारताचा सन्मान करत आहेत. कारण त्यांनाही माहीत आहे की, भारतातील जनतेचा एनडीएवर विश्वास आहे. भारतातील जनमत कोणाबरोबर आहे? हेही त्याना माहीत आहे.
तसेच, एनडीएचा विस्तार हा केवळ संख्या आणि भौगोलिक विस्ताराचा नाही. तर देशातील जनताही आपला इतिहास पाहत आहे. तुमची मेहनत फळाला येणार आहे. देशातील जनतेचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.