नवी दिल्ली: जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 (Jammu-Kashmir Article 370) हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य होता, असा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सुनावला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही स्वागत केले. PM मोदींनी आज #NayaJammuKashmir हॅशटॅगसह ट्विट केले की, 'कलम 370 रद्द करण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय ऐतिहासिक असून, या निर्णयामुळे संसदेने 5 ऑगस्ट 2019 रोजी घेतलेला निर्णय घटनात्मकदृष्ट्या कायम राहील.'
संबंधित बातमी -कलम ३७० हटवण्याचा केंद्राचा निर्णय योग्य आणि घटनात्मकदृष्ट्या वैध, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
पीएम मोदी पुढे लिहितात, 'आजचा निर्णय म्हणजे, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील आपल्या लोकांसाठी नवी आशा, प्रगती आणि एकतेची घोषणा आहे. न्यायालयाने आपल्या प्रगल्भ ज्ञानाने एकतेचे मूलतत्त्व बळकट केले, जे एक भारतीय म्हणून आपण सर्वांपेक्षा प्रिय आणि मोठे आहे. मी जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या लोकांना खात्री देऊ इच्छितो की, तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.'
'प्रगतीचे फायदे केवळ तुमच्यापर्यंतच नाही, तर ज्यांना कलम 370 मुळे त्रास सहन करावा लागला, अशा समाजातील सर्वात असुरक्षित आणि उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचतील, याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आजचा निर्णय हा केवळ कायदेशीर निर्णय नाही, हा आशेचा किरण आहे, उज्ज्वल भविष्याची प्रतिज्ञा आहे आणि एक मजबूत, अधिक अखंड भारत निर्माण करण्याच्या आपल्या सामूहिक संकल्पाचा दाखला आहे,' अशी प्रतिक्रिया पीएम मोदींनी व्यक्त केली.
राज्यात शांतता परत आली - अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ते म्हणाले, 'कलम 370 रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 5 ऑगस्ट 2019 रोजी पीएम नरेंद्र मोदी यांनी कलम 370 रद्द करण्याचा दूरदर्शी निर्णय घेतला. तेव्हापासून जम्मू-काश्मीरमध्ये शांतता परत आली आहे. एकेकाळी हिंसाचाराने ग्रासलेल्या राज्यात प्रगती आणि विकासामुळे मानवी जीवनाला नवा अर्थ प्राप्त झालाय. पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील समृद्धीमुळे जम्मू, काश्मीर आणि लडाख या दोन्ही भागातील रहिवाशांच्या उत्पन्नाच्या पातळीत वाढ झाली आहे.'