जातीनिहाय जनगणनेवर PM मोदी म्हणाले- "हा तर हिंदूंमध्ये फूट पाडून देश उद्ध्वस्त करायचा प्रयत्न"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 02:26 PM2023-10-03T14:26:20+5:302023-10-03T14:33:29+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये काँग्रेसवर केली सडकून टीका
Pm Modi on Caste Census: पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडमधील जगदलपूरच्या दौऱ्यावर असून त्यांनी बस्तरमधील दंतेश्वरी देवीच्या मंदिरात पूजा करून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर मोदींनी जाहीर सभेला संबोधित केले. जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आणि म्हणाले, "पूर्वी काँग्रेस म्हणायची की पहिला अधिकार अल्पसंख्याक आणि मुस्लिमांचा आहे, पण आता पहिला अधिकार कोणाचा असेल हे लोकं ठरवतील. काँग्रेसला अल्पसंख्याकांना हटवायचे आहे का? काँग्रेसला गरिबांमध्ये फूट पाडायची आहे का? माझ्यासाठी गरीब ही सर्वात मोठी जात आहे," अशा शब्दांत मोदींनी जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर भाष्य केले.
"गरीब जरी सामान्य श्रेणीतील असला तरी माझ्यासाठी गरीब सर्वांपेक्षा वरचा आहे. काँग्रेसला लोकांमधली दरी वाढवायची आहे. काँग्रेसने केवळ गरिबी दिली असून देशाचे तुकडे करण्याचे काम केले आहे. देशातील हिंदूंमध्ये फूट पाडून काँग्रेसला देश उद्ध्वस्त करायचा आहे. काँग्रेसचे नेते आता काँग्रेस पक्ष चालवत नाहीत. अनुभवी नेत्यांचे मत विचारात घेतले जात नाही. देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करणारे लोक काँग्रेस चालवत आहेत आणि लोकांच्या भावनांशी खेळत आहेत," असा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला.
"काँग्रेसने आजपर्यंत दुसऱ्या देशासोबत कोणता गुप्त करार केला आहे हे उघड केलेले नाही, पण देश पाहतोय की या करारानंतर काँग्रेसने देशावर आणखी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना भारतातील कोणत्याच गोष्टी आवडत नाहीत असे दिसते. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या या नव्या षडयंत्रापासून लोकांनी सावध राहायला हवे. देशाच्या साधनसंपत्तीवरील हक्काचा प्रश्न असेल, तर गरिबांचा पहिला हक्क आहे," अशा इशारा पंतप्रधानांनी दिला.