'राम मंदिरानंतरही विरोधक द्वेषाचा मार्ग सोडायला तयार नाही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 05:19 PM2024-02-22T17:19:15+5:302024-02-22T17:19:57+5:30
'हे तेच लोक आहेत, ज्यांनी प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला होता.'
PM Modi on Ram Mandir : पीएम नरेंद्र मोदींनी आज(दि.22) गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील तारभ येथील वलीनाथ महादेव मंदिराचे उद्घाटन केले. महादेव मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात जनतेला संबोधित केले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, आज देवाचे आणि देशाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. यावेळी राम मंदिराचा उल्लेख करत पंतप्रधानांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.
पंतप्रधान मोदींनी राम मंदिराचा उल्लेख करत म्हणाले की, काँग्रेसचे नेते नकारात्मकतेच्या भावनेत जगत आहेत. अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर बांधले गेले आहे, तरीदेखील त्यांचे नेते द्वेषाचा मार्ग सोडण्यास तयार नाहीत. हे तेच लोक आहेत, ज्यांनी प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला होता आणि मंदिराच्या उभारणीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
It is always special to be in Mehsana. The projects being launched from here will give fillip to the overall progress of this region. https://t.co/9o82GWLYyY
— Narendra Modi (@narendramodi) February 22, 2024
आता भगवान श्रीरामाच्या जन्मभूमीत भव्य मंदिर बांधले गेले आहे. यामुळे संपूर्ण देश आनंदी आहे. तरीदेखील हे लोक नकारात्मकता आणि द्वेषाचा मार्ग सोडत नाहीत. एकीकडे देशात मंदिरे बांधली जात आहेत तर दुसरीकडे गरिबांसाठी लाखो घरेही बांधली जात आहेत, असंही मोदी म्हणाले. तसेच, त्यांनी यावेळी 8,350 कोटींहून अधिकच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
विरोधकांचा राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार
गेल्या महिन्यात 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या सोहळ्याला हजारो लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. यात विरोधी पक्षांचाही समावेश होता. पण, राम मंदिर सोहळा भाजपचा कार्यक्रम असल्याची टीका करत विरोधकांनी या सोहळ्यात न जाण्याचा निर्णय घेतला.