पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (14 ऑगस्ट) भारताच्या फाळणीदरम्यान अमानुष दुःख्ख आणि वेदना सोसणाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मोदी म्हणाले, आजचा दिवस अशा लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे, ज्यांनी फाळणीचे चटके सोसून पुन्हा आपल्या जीवनाला नव्याने प्रारंभ केला. ब्रिटिश वसाहतवादी राजवटीने 1947 मध्ये आजच्याच दिवशी भारताची फाळणी केली होती. यानंतर पाकिस्तानच्या रुपाने नव्या देशाचा जन्म झाला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "फाळणीच्या स्मृती दिनानिमित्त, आपण त्या लोकांचे स्मरण करत आहोत, जे फाळणीच्या भयावहतेने प्रभावित झाले आणि प्रचंड त्रास सहन केला. त्यांच्या धैर्याला श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे, ज्यांनी मानवाची सावरण्याची शक्ती दर्शवली. फाळणीमुळे प्रभावित झालेल्या अनेकांनी आपल्या जीवनाची नव्याने सुरूवात केली आणि मोठे यशही मिळवले. आज आम्ही आपल्या देशातील एकता आणि बंधुतेचे सदैव रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचाही पुनरुच्चार करतो.
अमित शाह यांनीही अर्पण केली श्रद्धांजली -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही फाळणीच्या स्मृती दिनानिमित्त फाळणीच्या झळा सोसलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, "आज फाळणीच्या स्मृती दिनानिमित्त, त्या सर्वांना श्रद्धांजली, ज्यांनी इतिहासातील सर्वात क्रूर प्रकरणादरम्यान अमानुष यातनांचा सामना केला, जीव गमावला, आणि बेघर झाले. आपला इतिहास स्मरणात ठेवून आणि त्यातून काही बोध घेऊनच एक राष्ट्र आपले मजबूत भविष्य निर्माण करू शकते आणि एका शक्तिशाली देशाच्या रूपात समोर येऊ शकतो."