नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे महाबलीपूरममध्ये स्वागत केले आले. पंतप्रधान मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दोन दिवसांच्या शिखर परिषदेसाठी भारताकडून जय्यत तयारी करण्यात आली. नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी महाबलीपूरम येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता केली. महाबलीपूरमच्या समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असताना त्यांनी समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिकचा कचरा गोळा केला. समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारल्यानंतर मोदींनी एक कविता लिहिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी समुद्राशी संवाद साधणारी एक सुंदर कविता लिहिली आहे. रविवारी (13 ऑक्टोबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही कविता शेअर केली आहे. 'हे... सागर!!! तुम्हें मेरा प्रणाम!' असं म्हणत मोदींनी समुद्राशी असणारे नाते उलगडले आहे. 'महाबलीपूरमच्या समुद्र किनाऱ्यावर फिरताना समुद्राशी संवाद साधण्यात मी हरवून गेलो. ही कविता म्हणजे माझे भावविश्व आहे. माझ्या भावना शब्दबद्ध करत आहे.' असं म्हणत मोदींनी आपली कविता ट्विट केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (12 ऑक्टोबर) सकाळी महाबलीपूरम येथील समुद्र किनाऱ्यावर जवळपास अर्धा तास कचरा गोळा केला. प्लास्टिकची पाकिटं, बाटल्या आणि इतर कचरा मोदींनी गोळा करून साफसफाई केली आहे. तसेच व्हिडीओ पोस्ट करून सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे असं म्हटलं. 'आपण सर्वांनीच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच आपण सर्वांनी तंदुरुस्त राहाण्याचाही प्रयत्न करायला हवा' असं आवाहन नागरिकांना मोदींनी केलं आहे. साफसफाईचा तीन मिनिटांचा व्हिडिओ ट्विटवर पोस्ट करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी गोळा केलेला प्लास्टिकचा कचरा हा ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या हॉटेलचा कर्मचारी जयराज यांच्याकडे दिला.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे शुक्रवारी दुपारी चेन्नई विमानतळावर भरतनाट्यम आणि लोकनृत्य कलाकारांनी तामिळ सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून मोठ्या उत्साहात स्वागत केले. काश्मिरातील कलम 370 हटविल्यानंतर प्रथमच मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग द्विपक्षीय संबंधात संतुलन आणण्यासाठी प्रयत्नांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.