सरकारी कंपन्यांबाबत अफवा पसरवल्या, आज LIC चे शेअर्स विक्रमी पातळीवर; मोदींचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 03:33 PM2024-02-07T15:33:18+5:302024-02-07T15:34:02+5:30
PM Modi Rajya Sabha Speech: 'BSNL आणि MTNL बुडवणारे कोण? HALची दुर्दशा कुणामुळे झाली? युपीएच्या काळात सरकारी कंपन्यांची दुर्दशा होती.'
PM Modi Rajya Sabha Speech: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेनंतर आज राज्यसभेतून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या काळातील विकास आणि भाजपच्या काळातील विकासचा मुद्दा मांडला. तसेच, काँग्रेसच्या काळातील सरकारी कंपन्यांची अवस्था आणि आजची अवस्था सांगितली.
संबंधित बातमी- 'खरगेजींचे विशेष आभार, त्यांनी NDAला 400 जागांचा आशीर्वाद दिला', PM मोदींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले की, सरकारी कंपन्यांवर नाही-नाही ते आरोप झाले. मारुतीच्या स्टॉकचे काय झाले होते, हे देशाला माहित आहे. काँग्रेस म्हणाली की, आम्ही सरकारी कंपन्यांना बुडवले. बीएसएनएल आणि एमटीएनएल बुडवणारे कोण होते? एचएएलची दुर्दशा कशामुळे झाली? युपीएच्या काळात सरकारी कंपन्यांची ही परिस्थिती कोणी केली? आज HAL विक्रमी महसूल मिळवत आहे. आज HAL ही आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर निर्मिती कंपनी बनली आहे. आमच्या सरकारने विकासाची कामे केली.
एलआयसीबाबतही अफवा पसरवण्यात आल्या होत्या. एखाद्याला नष्ट करायचे असेल, तर खोटी माहिती, संभ्रम पसरवला जातो. गावात कोणाला मोठा बंगला घ्यायचा असेल तर तो झपाटलेला बंगला असल्याची अफवा पसरवली जाते. एलआयसीबाबतही अशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या. मी तुम्हाला छातीठोकपणे सांगू इच्छितो, आज LIC चे शेअर्स विक्रमी पातळीवर व्यवहार करत आहेत. हे लोक आजही व्होकल फॉर लोकसपासून दूर पळतात. काँग्रेसने चुकीचे नरेटिव्ह सेट केले, ज्याचा परिणाम काय झाला? तर आज भारतातील संस्कृती आणि सभ्यतेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना हीन समजले जाऊ लागले. अशा प्रकारे आपल्या भूतकाळावर अन्याय झाला.
मला आरक्षण आवडत नाही, नोकरीत तर अजिबातच नको; PM मोदींनी वाचलं नेहरुंचं पत्र
पीएम मोदी पुढे म्हणाले, UPA सरकारमध्ये 234 PSU होते, आज 254 PSU आहेत, आम्ही 20 ने वाढ केली. PSU विकल्याचा आरोप आमच्यावर केला, पण आम्ही यात वाढ केली. बहुतांश PSU विक्रमी पातळीवर नफा देत आहेत. PSU चा निव्वळ नफा 1.25 लाख रुपये होता, जो आज वाढून अडीच लाख कोटी रुपये झाला आहे. आमच्या गेल्या 10 वर्षांत PSUs चे नेटवर्थ 9.5 लाख कोटी रुपयांवरुन 17 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले. PSU बंद करण्याबाबत अफवा पसरवण्यात आल्या. मेहनत करुन आम्ही आमची देशाची प्रतिष्ठा वाढवली. सामान्य गुंतवणूकदाराचे नुकसान होईल अशा पद्धतीच्या गोष्टी पसरू नका, असे आवाहनही मोदींनी यावेळी विरोधकांना केले.