वेगाचा राजा...चित्ता आला! अखेर ७० वर्षांनी चित्त्यांचं भारतात पाऊल, मोदींकडून स्वागत अन् फोटोसेशन!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 12:10 PM2022-09-17T12:10:52+5:302022-09-17T12:11:42+5:30
भारतातून १९५२ साली नामशेष झालेले चित्ते आज तब्बल ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये आज नामिबियातून ८ चित्ते आणण्यात आले.
भोपाळ-
भारतातून १९५२ साली नामशेष झालेले चित्ते आज तब्बल ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये आज नामिबियातून ८ चित्ते आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्यांच्याच हस्ते या चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात आलं. चित्त्यांनी भारतात पाऊल ठेवल्यानंतरचे खास क्षण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कॅमेरामध्ये टिपले. तसंच आजचा दिवस देशासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचं ते म्हणाले.
"हे दुर्दैव आहे की आपण 1952 मध्ये देशातून चित्ते नामशेष झाल्याचं घोषित केलं, परंतु अनेक दशकांपासून त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही अर्थपूर्ण प्रयत्न केले गेले नाहीत. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आता देशात नव्या ऊर्जेने चित्त्यांचे पुनर्वसन होऊ लागलं आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचं रक्षण झालं की आपले भविष्यही सुरक्षित असतं हे खरं आहे. विकासाचे आणि समृद्धीचे मार्गही खुले होतात. कुनो नॅशनल पार्कमध्ये जेव्हा चित्ता पुन्हा धावतील, तेव्हा येथील गवताळ प्रदेशाची परिसंस्था पुन्हा पूर्ववत होईल", असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं.
PM Modi releases 8 cheetahs in MP's Kuno National Park
— ANI Digital (@ani_digital) September 17, 2022
Read @ANI Story | https://t.co/NVlXzeiKWp#CheetahIsBack#Cheetahs#NarendraModi#PMModipic.twitter.com/vmUMwm4yHm
१६ तासांच्या प्रवासानंतर चित्ते भारतात
नामिबियावरून आठ चित्ते घेऊन येणारं विशेष मालवाहू विमान आज मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे उतरलं. हे विमान भारतात येण्याच्या एक दिवस आधी पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यानंतर हे आठ चित्ते ग्वाल्हेरहून भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरने मध्य प्रदेशातील श्यापूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले. या आठ चित्त्यांसाठी कुनो राष्ट्रीय उद्यानात विशेष क्षेत्र तयार करण्यात आले आहे. नामिबियाहून आल्यानंतर चित्त्यांना काही काळ क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi releases the cheetahs that were brought from Namibia this morning, at their new home Kuno National Park in Madhya Pradesh.
— ANI (@ANI) September 17, 2022
(Source: DD) pic.twitter.com/CigiwoSV3v
पाच मादी व तीन नर चित्ते
नामिबियातून भारतात आणल्या जाणाऱ्या आठ चित्त्यांमध्ये पाच मादी व तीन नर आहेत. त्यापैकी पाच मादी चित्त्यांचे वय दोन ते पाच वर्षे दरम्यान तर तीन नर चित्त्यांचे वय ४.५ ते ५.५ वर्षे दरम्यान आहे, अशी माहिती चित्ता कॉन्झर्व्हेशन फंड (सीसीएफ) या स्वयंसेवी संस्थेने दिली.