- ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 25 - पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने 2002 गुजरात दंगलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरलं आहे. हार्दिक पटेलने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच चिठ्ठी पाठवून त्यात हा उल्लेख केला आहे. दंगलीमध्ये पाटीदार समाजाच्या तरुणांचा वापर करण्यात आला, आणि हे सारे तरुण कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत असाही आरोप हार्दिक पटेलने केला आहे.
'2002 मधील दंगलीचा फायदा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अगोदर मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर पंतप्रधान पद मिळवलं. दुसरीकडे पाटीदार समाजाच्या लोकांना दोषी ठरवलं गेल, आणि कारागृहात बंद करण्यात आलं. प्रधानमंत्री असल्याने नरेंद्र मोदी राष्ट्रपतींकडे या लोकांची शिक्षा माफ करण्याची विनंती करु शकतात. मात्र मोदी असं करणार नाहीत कारण त्यांना देशाला आणि जगाला आपण धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवून द्यायचं आहे', असं हार्दिक पटेलने चिठ्ठीत लिहिलं आहे.
भाजपाने मात्र हार्दिक पटेलच्या चिठ्ठीवर उत्तर देण्याचं टाळत त्याला विनाकारण महत्व द्यायचं नाही आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. हार्दिक पटेल सध्या राजस्थानमधील उदयपूरमध्ये राहत आहे. राष्ट्रद्रोहाच्या प्रकरणांत हार्दिकला जामीन मंजूर करत असताना सहा महिने गुजरातच्या बाहेरच राहावे आणि गुजरातमध्ये कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही, असे लिहून द्यावे, या अटी न्यायालयाने घातल्या होत्या. तसंच सुटका झाल्यानंतर 48 तासांत गुजरात सोडावे अशी अटही घालण्यात आली आहे.