नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळ्यातात सहभागी झाले. यावेळी त्यांनी 51,000 हून अधिक ननवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी पंतप्रधानांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात देशाच्या स्वातंत्र्याचे आणि करोडो लोकांचे रक्षक बनल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आज ज्या तरुणांना नियुक्तीपत्रे मिळत आहेत, ते देशसेवा करण्याबरोबरच देशातील नागरिकांचेही रक्षण करतील.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, देश अभिमानाने आणि आत्मविश्वासाने भरलेला असताना या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. एकीकडे चंद्रयान-3 यशस्वी झाले अन् दुसरीकडे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रवास सुरू करणार आहात. दशकभरात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होईल. अर्थव्यवस्था समृद्ध होण्यासाठी प्रत्येक क्षेत्राने पुढे जाणे आवश्यक आहे. आज ऑटोमोबाईल आणि ऑटो-कॉम्पोनंट उद्योग 12 लाख कोटींहून अधिक किमतीचा आहे. ही वाढ हाताळण्यासाठी, उद्योगाला तरुणांची आवश्यकता असेल आणि त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध असतील.
मोदी पुढे म्हणाले की, 9 वर्षांपूर्वी प्रधानमंत्री जन धन योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेने गावातील आणि गरिबांच्या आर्थिक सक्षमीकरणात तसेच रोजगार निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावली. या योजनेअंतर्गत गेल्या 9 वर्षांत 50 कोटींहून अधिक जन धन खाती उघडण्यात आली आहेत. जन धन खात्यांमुळे खेड्यातील महिला बचत गटांना बळकट करण्यासाठीही खूप मदत झाली आहे. अनेक महिला लखपती दीदी झाल्या आहेत. या योजनेने देशातील सामाजिक आणि आर्थिक बदलांना गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रोजगाराच्या संधी निर्माण केल्याने उत्पन्न वाढेल आणि सर्वांचे जीवनमान चांगले राहील.
गेल्या 9 वर्षांत आमच्या प्रयत्नांमुळे बदलाचा एक नवीन टप्पा दिसू लागला आहे. गेल्या वर्षी भारताने विक्रमी निर्यात केली. जागतिक बाजारपेठेत भारतीय वस्तूंची मागणी सातत्याने वाढत असल्याचे हे द्योतक आहे. 'व्होकल फॉर लोकल' या मंत्राला अनुसरून भारत सरकारही 'मेड इन इंडिया' लॅपटॉप, कॉम्प्युटर यासारख्या उत्पादनांच्या खरेदीवर भर देत आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगमध्येही वाढ झाली असून तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत, असंही पीएम मोदी म्हणाले.