Narendra Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अलीकडेच G7 शिखर परिषदेसाठी इटलीला गेले होते. तिथे त्यांनी अनेक देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली. त्या परिषदेत रशिया-युक्रेन युद्धाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. आता यानंतर पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात थेट रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे ते त्यांचे खास मित्र, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची भेट घेतील.
संपूर्ण जगाचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याकडे लागले आहे. याचे कारण म्हणजे, युक्रेन युद्धानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच रशियाला जाणार आहेत. या दौऱ्यात घेतलेल्या निर्णयांचा भारतासह संपूर्ण जगावर परिणाम होऊ शकतो. पंतप्रधान मोदी युक्रेन युद्धाबाबतही राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी बोलू शकतात. दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मॉस्कोला गेले होते. पाच दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचीही भेट घेतली. त्यावेळी पुतिन यांनी पीएम मोदींना रशियाला येण्याचे निमंत्रण दिले होते.
विशेष म्हणजे, आत्तापर्यंत भारत आणि रशियामध्ये 21 शिखर परिषदा झाल्या आहेत. या दोन्ही प्रमुख नेत्यांची शेवटची भेट 2021 मध्ये दिल्लीत झाली होती. युक्रेन युद्धानंतर भारत आणि रशियामधील संबंध दृढ राहिले आहेत. आतापर्यंत भारताने युक्रेनवरील हल्ल्याबद्दल रशियाला कधीच जबाबदार धरले नाही. पण, हे प्रकरण मुत्सद्दीपणाने आणि संवादाने सोडवले जावे, असे वारंवार सांगितले आहे.