हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काशी ही अविनाशी आहे, मी काशीचा आहे, म्हणून मी अविनाशी आहे, या शब्दांत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी स्वतःचे वर्णन करत अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे संकेत दिले. पं. जवाहरलाल नेहरू यांनी सलग तीनवेळा पंतप्रधान होण्याचा विक्रम केला होता. त्या अनुषंगाने मी तीनवेळा, पाचवेळा नव्हे तर सातवेळा देखील पंतप्रधान बनू शकतो. मला १४० कोटी भारतीयांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे हे चक्र असेच पुढेही सुरू राहील, असे मोदी म्हणाले. त्यामुळे मोदी ७५व्या वर्षी निवृत्त होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
मोदी म्हणाले, मी किती वेळा पंतप्रधान झालो हे विश्लेषकांनी मोजू नये. त्याऐवजी मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताची किती प्रगती झाली, त्याचे विश्लेषण करावे. जनतेच्या सेवेसाठी देवानेच आपल्याला शक्ती प्रदान केली आहे. मागील आठवड्यात एका मुलाखतीत ते म्हणाले, माझा जन्म हा इतरांप्रमाणे केवळ जैविक व नैसर्गिक प्रक्रियेचा भाग नाही, तर परमेश्वराने काही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मला पृथ्वीवर पाठविल्याची माझी श्रद्धा आहे. माझ्या आईच्या निधनानंतर ही श्रद्धा अधिक बळकट झाली. मोदी यांच्या या विधानामध्ये त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो, असे मत राजकीय निरीक्षकांनी नोंदविले आहे.
'मुस्लिम व्होटबँकेला विरोधकांचा मुजरा'
- दलित व मागासवर्गीयांच्या आरक्षणाची चोरी करण्याचा इंडिया आघाडीचा डाव आहे. मुस्लिम व्होटबँकेला इंडिया आघाडी मुजरा करते, तसेच तिने त्यांची गुलामीही पत्करली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला.
- बिहारमधील प्रचारसभांत मोदी म्हणाले की, एससी, एसटी, ओबीसी यांच्या आरक्षणाची चोरी करण्याचा व त्या जागा मुस्लिमांना देण्याचा डाव मी उधळून लावीन.
‘वन रँक, वन पेन्शन’ला कॉंग्रेसचा विरोध
- उत्तर प्रदेशाच्या गाझीपूर येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, लष्करी जवानांसाठी ‘वन रँक वन पेन्शन’ योजना राबविण्यास काँग्रेस तयार नव्हती.
- ही योजना आमच्या सरकारने लागू केली. कामे पुढे ढकलण्यात आणि दुसऱ्यांचे हक्क हिरावून घेण्यात काँग्रेसचा हातखंडा आहे.