बघेल सरकारची उलटी गणती; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, ओबीसींकडे काँग्रेसचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 09:27 AM2023-11-14T09:27:41+5:302023-11-14T09:27:57+5:30
मुंगेली व महासमुंद जिल्ह्यात प्रचारसभांमध्ये पंतप्रधान म्हणाले की, छत्तीसगड लुटणे व स्वतःची तिजोरी भरणे हेच काँग्रेसचे उद्दिष्ट आहे.
मुंगेली/महासमुंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काँग्रेसवर भ्रष्टाचार तसेच इतर मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत छत्तीसगडमधून काँग्रेसच्या बघेल सरकारची बाहेर पडण्याची उलटी गणती सुरू झाल्याचे सांगितले.
मुंगेली व महासमुंद जिल्ह्यात प्रचारसभांमध्ये पंतप्रधान म्हणाले की, छत्तीसगड लुटणे व स्वतःची तिजोरी भरणे हेच काँग्रेसचे उद्दिष्ट आहे, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र आणि इतर नातेवाइक अधिकाऱ्यांनी ‘सुपर सीएम’ बनून राज्यकारभार चालवला. अनेक वर्षे ‘पंचायत ते संसदेपर्यंत’ सत्तेत असूनही काँग्रेसने ओबीसींसाठी आरक्षण लागू केले नाही.
मुख्यमंत्री पराभूत होणार
बघेल स्वतः विधानसभा निवडणुकीत हरणार आहेत, असे सांगून मोदी म्हणाले, “काँग्रेसलाही लक्षात आले आहे की, आता छत्तीसगडमध्ये आपली वेळ संपली आहे. दिल्लीतील काही पत्रकार मित्र आणि राजकीय विश्लेषकांनी मला सांगितले की मुख्यमंत्री स्वतः हरणार आहेत.”
नेत्यांनाही डावलले
बघेल आणि टी. एस. सिंग देव यांच्यात मुख्यमंत्रिपदाच्या कथित करार झाला, परंतु त्यांची अंमलबजावणी कधीच झाली नाही, काँग्रेसचा खरपूस समाचार घेत मोदी म्हणाले की, जो पक्ष आपल्याच वरिष्ठ नेत्यांना डावलतो तो लोकांना फसवणारच.