नवी दिल्ली: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची पाठ थोपटत कौतुक केले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील सुरक्षिततेशी कधी तडजोड केली नाही, त्यांनी नेहमीच सुरक्षेला प्राधान्य दिले, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदी बोलत होते. जेव्हा जनता यूपीच्या सुरक्षेबद्दल चर्चा करतात, तेव्हा ते मागील सरकारमधील माफियाराज, गुंडाराज होते. सरकारमध्ये बाहुबलींना आश्रय मिळत होता, याबाबतच चर्चा ऐकू येत होत्या. उत्तर प्रदेशमधील जनतेने या सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्या आहेत. एका ठराविक वेळेनंतर महिला घराबाहेर पडू शकत नव्हत्या, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.
योगींनी यूपीतील सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले
भाजपचे योगी सरकार उत्तर प्रदेशमध्ये आल्यानंतर गुंडाराज, माफियाराज संपुष्टात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सुरक्षितेला प्राधान्य दिले. अनेक नव्या गोष्टी राबवल्या. सुरक्षिततेशी कधीही तडजोड केली नाही. अंधार पडल्यानंतरही बाहेर पडू शकते, असे आज महिलांचे म्हणणे आहे. हा विश्वास सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. यूपीमध्ये एक काळ होता जेव्हा गुंड त्यांना हवे ते करू शकत होते. मात्र, आज तेच आत्मसमर्पण करतात, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.
देशातील निवडणुकांच्या पाचही राज्यात भाजपचीच लाट
आताच्या घडीला देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यास या प्रत्येक ठिकाणी भाजपची लाट असल्याचे पाहायला मिळत आहे. या राज्यांमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळेल. या पाच राज्यातील जनता भाजपला सेवेची संधी देईल. ज्या राज्यातील जनतेची सेवा करण्याची आम्हाला मिळाली, तेथे जनतेने आमचे काम पाहिले आहे. त्यामुळे तेथेही पुन्हा एकदा आमची सत्ता स्थापन होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात निवडणुका होणार असून, १० मार्च रोजी एकत्रितपणे मतमोजणी आहे. १० फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशमधील पहिल्या टप्प्याच्या मतदानापासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.