लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवात गदरोळाने झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नव्या मंत्र्यांची ओळख करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले. मात्र, विरोधकांनी विविध ज्वलंत प्रश्नांवर घोषणबाजी करून गोंधळ घातला. त्यामुळे ४३ नव्या मंत्र्यांचा परिचय मात्र होऊ शकला नाही. या एकूण प्रकारावरून मोदींनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आणि ते सभागृहातून निघून गेले. महिला तसेच मागासवर्गीय, आदिवासी समाजातील सदस्यांना मंत्रिपद मिळत असल्याचे विरोधकांच्या पचनी पडत नसल्याची टीका पंतप्रधानांनी विरोधकांवर केली.
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर नव्या सदस्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर प्रथेनुसार पंतप्रधान मोदी नव्या मंत्र्यांची ओळख करून देण्यासाठी उभे राहिले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी इंधनाच्या वाढलेल्या किमती तसेच कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. अनेक सदस्य फलके घेऊन लोकसभाध्यक्षांच्या आसनापुढे आले.
देशामध्ये ४० कोटींहून अधिक `बाहुबली’
देशामध्ये ज्यांनी कोरोना लस घेतली आहे, असे ४० कोटींपेक्षा अधिक `बाहुबली’ कोरोनाविरोधी लढ्यासाठी सज्ज झाले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. सभागृहाबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. मोदी यांनी सांगितले की, कोरोना लस बाहूमध्ये (दंडामध्ये) टोचून घेतली जाते. देशात ४० कोटींपेक्षा अधिक लोकांनी ही लस टोचून घेतली आहे.