नवी दिल्ली - बॉलिवूड दिग्गज अभिनेता इरफान खान याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या इरफानचे बुधवारी (29 एप्रिल) निधन झाले आहे. इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत असताना त्याच्या मृत्यूची बातमी आल्यााने सर्वांनाच धक्का बसला. देशभरातून इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन इरफानला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
'इरफान खानच्या निधनाने चित्रपट तसेच नाट्यसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्याने साकारलेल्या अष्टपैलू भूमिकांसाठी तो कायमच आपल्या लक्षात राहील. माझ्या सद्भावना त्याचे कुटुंब, मित्र परिवार आणि चाहत्यांबरोबर आहेत. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो' अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मनोरंजन, राजकीय आणि क्रिडा क्षेत्रातील दिग्गजांनी इरफानला श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'इरफान खान यांच्यात गुणी अभिनेत्याबरोबरच उत्तम व्यक्तिमत्व सामावले होते. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक वस्तूपाठ ठरेल असाच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली वाहिली. दुर्धर असा कॅन्सर झाला असूनही न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असताना परत उत्साहाने उभे राहिले. दुर्दैवाने काळाने त्यांना ओढून नेले आणि अभिनयाचा त्यांचा प्रवास थांबला. त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली', अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अष्टपैलू अभिनेता इरफान खान याची एक्झिट बॉलिवूडसह सगळ्यांनाच मनाला चटका लावून गेली. त्याच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 'पान सिंग तोमर'साठी इरफानला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इरफानने 1995 मध्ये सुतपा सिकंदरसोबत लग्न केले. इरफान आणि सुतपाला बबिल आणि आयन अशी दोन मुले आहेत. इरफान खानचा जन्म जयपूरमध्ये झाला होता. त्याच्या वडिलांचा टायरचा बिझनेस होता. बॉलिवूडमधील प्रवासात इरफानला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र तो कधीच हिम्मत हरला नाही. 'सलाम बॉम्बे'मध्ये त्याला छोटीशी भूमिका साकारायला मिळाली होती. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. पिकू, पान सिंग तोमर, द लंचबॉक्स, हिंदी मीडियम, मुंबई मेरी जान यांसारख्या बॉलिवूडच्या चित्रपटात एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या.