नवी दिल्ली: जग सध्या संकटातून जात असून भगवान बुद्धांनी दाखवलेला मार्गच यातून जगाला तारू शकतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं देशाला संबोधित केलं. यामध्ये मोदींनी बुद्धांच्या अष्टांग मार्गांचा विशेष उल्लेख केला. त्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात धम्म चक्र दिवसाच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेकडून (आयबीसी) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.आज संपूर्ण जग अतिशय अवघड परिस्थितीचा आणि आव्हानांचा सामना करत आहे. भगवान बुद्धांनी दिलेल्या शिकवणीत या आव्हानांवर मात करण्याची क्षमता आहे. बुद्धांचे विचार कालानुरूप आहेत. ते भूतकाळात तर अनुरूप ठरलेच. मात्र वर्तमानकाळ आणि भविष्यकाळासाठीदेखील ते सुसंगत आहेत. भगवान बुद्धांनी दाखवलेले अष्टांग मार्ग समाज आणि देशांच्या कल्याणासाठी उपयोगी आहेत. करूणा आणि दया यांचं महत्त्व बुद्धांची शिकवण अधोरेखित करते. विचार आणि क्रिया या दोन्हीमध्ये बुद्धांच्या शिकवणीमुळे अधिक स्पष्टता येते, असं प्रतिपादन मोदींनी केलं.देशवासीयांनी बुद्धांचा संदेश, त्यांचे विचार, त्यांनी दिलेली शिकवण सदैव स्मरणात ठेवावी, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. 'बुद्धांच्या शिकवणीतून प्रोत्साहन मिळतं. त्यामधून मनशांती मिळते. बुद्धांची शिकवण आचारणात आणल्यास देशातील तरुणांना योग्य मार्ग मिळेल. जागतिक समस्यांवरील प्रश्नांची उत्तरं शोधण्यास त्यामुळे मदत होईल,' असं पंतप्रधान म्हणाले. व्हिडीओ संबोधनाच्या माध्यमातून मोदींनी देशवासीयांना आषाढ पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. 'आज गुरू पौर्णिमा आहे. हा आपल्या गुरुजनांचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्याच भावनेतून आपण आज बुद्धांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत,' असं मोदींनी म्हटलं.
भगवान बुद्धांचा मार्गच सध्याच्या आव्हानांमधून जगाला तारू शकेल- पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 10:07 AM
पंतप्रधान मोदींकडून बुद्धांच्या अष्टांग मार्गाचा विशेष उल्लेख
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भगवान बुद्धांना वंदनबुद्धांचे विचार कालसुसंगत आणि जगासाठी मार्गदर्शक- मोदीपंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना आषाढी पौर्णिमेच्या शुभेच्छा