नवी दिल्ली : लवकरच उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारत पहिल्या पन्नासात असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज पंतप्रधानांनी देशातील प्रमुख उद्योगपती आणि धोरणकर्त्यांसोबत संवाद साधला. उद्योगस्नेगही धोरणांसाठी जिल्हास्तरावर बदल होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. जगातील उद्योगस्नेही देशांचा विचार केल्यास भारत सध्या 77व्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या स्थानात 53 क्रमांकांनी सुधारणा झाली आहे. गेल्या 7 ते 8 वर्षांमध्ये कोणत्याच देशाला इतकी मोठी झेप घेता आलेली नाही, असं पंतप्रधान म्हणाले. उद्योगस्नेही धोरणांबद्दल देशानं केलेली प्रगती नेत्रदीपक असल्याचं मोदींनी म्हटलं. 'सध्या भारत आशियात चौथ्या स्थानी आहे. चार वर्षांपूर्वी आपण या यादीत सहाव्या स्थानी होतो. पहिल्या पन्नासात पोहोचण्यापासून आपण थोडेच मागे आहोत. यासाठी राज्य सरकारांसोबत सतत चर्चा सुरू आहे. जिल्हा स्तरावर एक मानांकन यंत्रणा तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्याराज्यांमधील स्पर्धा वाढावी आणि त्यातून व्यापार, उद्योग क्षेत्राची वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत,' असं मोदींनी म्हटलं. या बैठकीत मोदींनी जिल्हा स्तरावरील उद्योगस्नेही वातावरण वाढावं, यावर भर दिला. 'जिल्हा स्तरावरील वातावरण उद्योगस्नेही व्हावं, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा जिल्ह्यांमधील उद्योग सुकर व्हावा, त्यांच्यातील स्पर्धा वाढावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा स्तरावरील स्थिती आणखी सुधारावी, याची काळजी घेतली जात आहे. जिल्हा स्तरावरील परिस्थिती सुधारल्यास त्याचा मोठा फायदा देशाला होईल,' अशी आशा त्यांनी व्यक्त केली.