नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना पुन्हा एकदा काश्मीरबाबतची भूमिका व्यक्त केली. काश्मीरचे समाधान 'शिव्या देऊन अन् गोळ्या झाडून होणार नाही, तर काश्मिरवासियांना गळाभेट देऊन होईल, असे मोदींनी म्हटले. मात्र, दहशतवादाबाबत कुठलिही संयमी भूमिका भारत घेणार नाही. काही मुठभर फुटीरतावादी काश्मीरचे वातावरण खराब करत असल्याचेही मोदींनी या भाषणात सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना, सर्वसामान्य नागरिकांपासून ते अंतराळपर्यंतच्या मुद्द्यांना हात घातला. देशातील बलात्कार, अत्याचार, शेतकरी वर्ग, तीन तलाक, आयुष्यमान योजना यांसह देशातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. तसेच काश्मीर खोऱ्यातील बिघडलेल्या वातावरणाबाबातही मोदींनी चिंता व्यक्त केली. दहशतवादी बुरहानवाणीच्या खात्यानंतर काश्मीरमधील वातावरण अधिकच खराब बनले आहे. काश्मीरमध्ये तरुणांकडून दगडफेक आणि हिंसात्मक घटना घडवून आणल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी काश्मीरचा प्रश्न केवळ प्रेमानेच सुटेल, असे म्हटले.
जम्मू काश्मीरचा विकास आणि प्रगती देशावासियांचा संकल्प आहे. त्यामुळे काश्मीच्या प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध असून पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या काश्मीरचे स्थान अबाधित ठेवणार असल्याचे मोदींनी म्हटले. काश्मीरमध्ये ज्या काही अनुचित घटना घडत आहेत, काही फुटीरतावाद्यांकडून तेथे वातावरण खराब करण्यात येत आहे. मात्र, मला चांगल माहती आहे की, 'न गाली से, न गोली से, हर एक कश्मीरी को गले लगाने से समस्या सुलझने वाली है। न गाली से, न गोली से...परिवर्तन होगा गले लगाने से।' असे म्हणत मोदींनी काश्मीरचा प्रश्न प्रेमानेच संपेल असे सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपने काश्मीरमधील पीडीपीसोबत असलेली युती तोडली असून त्यास काश्मीरमधील वातावरण हेच प्रमुख कारण असल्याचे म्हटले होते.