नवी दिल्ली : कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. बडे-बडे देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. भारतातही कोरोनाने मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (रविवारी) पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी एकता आणि बंधुता महत्वाची असल्याचे म्हणत, कोरोना व्हायरस जात-धर्म पाहत नाही, असे म्हटले आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या एका ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे, की 'कोरोना व्हायरस हल्ला करण्यापूर्वी जात, धर्म, रंग, समुदाय, भाषा अथवा सीमांचा विचार करत नाही. यामुळे आपल्या प्रतिक्रिया आणि आचरणात एकता आणि बंधुतेला महत्व द्यायला हवे. आम्ही यात सोबत आहोत : पीएम नरेंद्र मोदी.'
दुकानदारांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे -मोदी म्हणाले, भविष्यातही दुकानांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. संकटाच्या काळात केलेल्या सहकार्याबद्दल सर्व दुकानदार आणि व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत. छोट्या-छोट्या दुकानदारांनीही संपूर्ण सामाजिक व्यवस्था योग्य प्रकारे राखत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. समाज आणि देश यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवील. स्वतः सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आणि इतरांनाही करायाला लावणे, हे अत्यंत कठीन काम आहे. जरा कल्पना करा, की आपल्या छोट्या-छोट्या व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी स्वतःच्या जीवाचा धोका पत्करून आपल्याला आवश्यक गरजा पुरवल्या नसत्या तर काय झाले असते?
एका नव्या बिझनेस मॉडेलची आवश्यकता -सोशल मीडिया लिंक्डइनवर मांडलेल्या आपल्या विचारांत मोदी म्हणाले, कोरोना व्हायरसच्या संकटाने संपूर्ण जगाला जाणीव झाली आहे, की आता एका नव्या बिझनेस मॉडेलची आवश्यकता आहे. तरुणांनी भरलेला भारत देश कोरोना संकटानंतर जगाला हे नवे मॉडेल देईल. कोरोना संकटाने किती बदल केला आहे. कुणीही ज्याचा विचार केला नसेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही मोदी म्हणाले.