"मुंबईतील मजुरांना मोफत तिकिटे देऊन यूपी, बिहारमध्ये पाठवले; महाराष्ट्र काँग्रेसमुळेच देशभर पसरला कोरोना"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 06:06 AM2022-02-08T06:06:38+5:302022-02-08T06:07:53+5:30

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सोमवारी उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, दिल्लीच्या सरकारनेही मजुरांना ते शहर सोडायला सांगितले व त्यांच्यासाठी अनेक बसची व्यवस्था केली. याचा परिणाम पंजाब, उत्तराखंडमध्येही कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला.

PM Modi says Workers from Mumbai were given free tickets and sent to UP, Bihar; Corona spread across the country due to Maharashtra Congress | "मुंबईतील मजुरांना मोफत तिकिटे देऊन यूपी, बिहारमध्ये पाठवले; महाराष्ट्र काँग्रेसमुळेच देशभर पसरला कोरोना"

"मुंबईतील मजुरांना मोफत तिकिटे देऊन यूपी, बिहारमध्ये पाठवले; महाराष्ट्र काँग्रेसमुळेच देशभर पसरला कोरोना"

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोनाच्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसने मुंबईत स्थलांतरित मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे देऊन उत्तर प्रदेश, बिहारमध्ये परत जाण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच त्या राज्यांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सोमवारी उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, दिल्लीच्या सरकारनेही मजुरांना ते शहर सोडायला सांगितले व त्यांच्यासाठी अनेक बसची व्यवस्था केली. याचा परिणाम पंजाब, उत्तराखंडमध्येही कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला.

मोदी यांनी सांगितले की, मेक इन इंडिया मोहिम कशी यशस्वी होणार नाही हे काँग्रेसने सांगत आहे. या योजनेत कोणताही भ्रष्टाचार होत नाही. मेक इन इंडियामधून पैसे उकळणे कोणालाही शक्य नाही. त्यामुळे काँग्रेसचा तिळपापड होत आहे.

फोडा आणि झोडा हेच काँग्रेसचे धोरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस हा तुकडे तुकडे गँगचा लीडर आहे. फोडा आणि झोडा हेच काँग्रेसचे धोरण आहे. काँग्रेसनेच तामिळी जनतेच्या भावनांचा अवमान केला होता. अनेक अतिशय चुकीच्या गोष्टी या पक्षाने आजवर केल्या आहेत. अजून १०० वर्षे तरी आपण सत्तेत येणार नाही अशा मानसिकता काँग्रेसने केली आहे. तसे असेल तर आम्हीही त्यांना सत्तेवर येऊ न देण्याची तयारी केली आहे.

छोट्या शेतकऱ्यांच्या विरोधात काही 
मंडळी, विरोधक कट रचत आहेत. देशातील छोट्या शेतकऱ्यांना भक्कम पायावर उभे करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मात्र काही जण शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून राजकारण करत आहेत.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

काँग्रेसचा अहंकार कायम
मोदी म्हणाले की, अनेक राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला. तरी तो पक्ष आपला अहंकार सोडायला तयार नाही. आत्मनिर्भर भारत निर्माण व्हावा अशी काँग्रेसची इच्छा दिसत नाही. काँग्रेसने कधीही महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण केले नाही. लोकलसाठी व्होकल होणे हे गांधींजींचे स्वप्न आम्ही पूर्ण करताना विरोधक आडकाठी आणत आहेत.

‘काँग्रेसने सत्तेवर येण्याची इच्छाशक्ती गमावली’ -
तेलंगणाची निर्मिती काँग्रेसनेच केली तरी तेथील जनता पक्षाला स्वीकारायला तयार नाही. काँग्रेसने पुन्हा सत्तेवर येण्याची इच्छाशक्तीच गमावली आहे. एखाद्याच्या मनासारखे होत नसेल तर तो गोष्टी नासवण्याच्या मागे लागतो, अशा कठोर शब्दात मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
 

Web Title: PM Modi says Workers from Mumbai were given free tickets and sent to UP, Bihar; Corona spread across the country due to Maharashtra Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.