PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हरियाणातील हिसार येथे महाराजा अग्रसेन विमानतळावरून अयोध्येला जाणाऱ्या पहिल्या व्यावसायिक विमानाला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी, आज हरियाणा ते अयोध्या धाम पर्यंत विमानसेवा सुरू झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मात्र यापेक्षा पंतप्रधान मोदी आणि एका व्यक्तीच्या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण या व्यक्तीच्या पायात पंतप्रधान मोदी यांनी स्वतःहून बूट घातले. त्यामुळे ही व्यक्ती नेमकी कोण याबाबत अनेकांना प्रश्न पडू लागले आहेत. पंतप्रधान मोदींनी त्या व्यक्तीला दरडावून बूट घालायला लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा दौऱ्यात कैथलच्या रामपाल कश्यप यांची भेट घेतली. जेव्हा रामपाल कश्यप समोर आले तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी तुम्ही असे का केले, स्वतःला त्रास करुन का घेताय असा सवाल केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामपाल कश्यप यांना बूट घालायला दिले. पंतप्रधान मोदी यांनीही रामपाल यांना बुट घालण्यास मदत केली. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कैथलच्या रामपाल कश्यप यांनी १४ वर्षांपूर्वी शपथ घेतली होती की जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाहीत आणि मी त्यांना भेटत नाही तोपर्यंत बूट घालणार नाही. २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले पण रामपाल कश्यपची इच्छा पूर्ण झाली, पण त्यांची भेट घेण्याचे अजूनही बाकी होते. मात्र रामपाल कश्यप आपल्या निर्धारावर ठाम होते आणि त्यांनी पायात चप्पल घातली नाही. सोमवारी जेव्हा पंतप्रधान मोदी हरियाणा दौऱ्याच्या दुसऱ्या मुक्कामात यमुनानगरला पोहोचले तेव्हा रामपाल कश्यप यांची १४ वर्षांची प्रतीक्षा संपली.
पंतप्रधान मोदींनी रामपाल कश्यप यांची भेट घेतली आणि नंतर त्यांना असे न करण्यास सांगितले. पंतप्रधान मोदींनी रामपाल कश्यप यांना नवीन बूट दिले जे त्यांनी पंतप्रधान मोदींसमोर घातले.
यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मिडिया पोस्टमधून या घटनेची माहिती दिली. "आज यमुनानगर येथील जाहीर सभेत मी कैथल येथील श्री रामपाल कश्यप जी यांना भेटलो. त्यांनी १४ वर्षांपूर्वी प्रतिज्ञा केली होती की मी पंतप्रधान होईपर्यंत आणि मला भेटेपर्यंत ते बूट घालणार नाही. मी रामपाल यांच्या सारख्या लोकांबद्दल नम्र आहे आणि त्यांचे प्रेम देखील स्वीकारतो. पण मी अशी शपथ घेणाऱ्या सर्वांना विनंती करू इच्छितो की कृपया सामाजिक कार्य आणि राष्ट्र उभारणीशी जोडलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा!," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.