Pm Modi Security Breach: आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक समोर आली. पंतप्रधाननरेंद्र मोदी सिगरा येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमधून बाहेर पडत असताना अचानक एका तरुणाने धावत जाऊन त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर उडी मारली. तरुणाने ताफ्यासमोर उडी मारल्याच्या वृत्ताने सुरक्षा यंत्रणांमध्ये घबराट निर्माण झाली. पोलिसांनी तत्काळ त्या तरूणाला ताब्यात घेतले. पंतप्रधानांचा ताफा पुढे गेल्यानंतर त्या तरूणाला सिगरा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या तरुणाकडून एक फाईलही सापडली आहे.
शनिवारी वाराणसीला पोहोचलेले पीएम मोदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान मोदी विमानतळाकडे रवाना झाले. दरम्यान, गाझीपूर येथील एक तरुण त्यांच्या ताफ्यासमोर आला आणि त्याने अचानक उडी मारली. तरूणाने जिथून उडी मारली तेथून पीएम मोदींची गाडी अवघ्या 10 फूट अंतरावर होती. या तरुणाला ताफ्यासमोर उडी मारताना पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या तरुणाला पोलीस ठाण्यात नेले.
चौकशीतून काय समजलं?
पोलिसांच्या चौकशीत तरुणाने सांगितले की तो सैन्य भरतीची तयारी करत होता. सुमारे तासभर पंतप्रधान मोदींच्या ताफ्याची वाट पाहत असल्याचे त्याने सांगितले. तरुणाकडून एक फाईलही सापडली आहे. या तरुणाने पोलिसांना सांगितले की, यापूर्वी सैन्य भरतीसाठी शारीरिक चाचणी पूर्ण केल्यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीत शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी दाद मागितली, मात्र त्यांची सुनावणी झाली नाही. त्यामुळे त्यांना त्यांची विनंती पंतप्रधानांपर्यंत पोहोचवायची होती. पोलिसांनी त्याला कोठडीत ठेवले आहे.