PM Modi Security Breach: पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार आता 'अॅक्शन मोड'मध्ये आलं आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही हयगय अजिबात सहन केली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत सविस्तर अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयानं (Home Ministry) पंजाब सरकारकडे (Punjab Government) मागितला आहे. दरम्यान भारतीय किसान युनियननं (क्रांतीकारी) आपल्याच कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अडवल्याचं कबूल केलं.
"दुपारी जवळपास २ वाजता आम्हाला समजलं की पंतप्रधान भटिंडाहून रस्त्यामार्गे येत आहेत. परंतु रॅलीजवळ एक हेलिपॅड होतं. अशातच पोलिसांनी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रस्त्यामार्गे येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यावेळी आम्हाला पोलीस खोटं बोलत आहेत, असं वाटलं. म्हणूनच आम्ही रस्ता रिकामा केला नाही," अशी माहिती बीकेयू क्रांतीकारीचे प्रमुख सुरजीत सिंह फूल यांनी दिली. टाईम्स नाऊशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
... तर मार्ग रिकामा केला असता"पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. परंतु पोलीस आणि शेतकऱ्यांची संख्या सारखीच होती. आम्ही मार्गातून हटलो नाही. पंतप्रधानांचा कार्यक्रम कसा बदलला याबद्दल आम्हाला माहित नाही. परंतु ते जर रस्ते मार्गानं येत असते याची कल्पना असती तर आम्ही मार्ग मोकळा केला असता," असंही ते म्हणाले.
माफीचा प्रश्नच नाही"माफी मागण्याचा कोणता प्रश्नच उद्भवत नाही. विरोध करणं हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. आम्ही विरोध करू शकत नाही का? आम्ही जे काही केलं ते योग्य केलं," असंही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फूल म्हणाले. १२-१३ शेतकरी संघटनांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारनं एमएसपीवर कोणतीही समिती स्थापन न केल्यानं आंदोलन करण्यात आलं होतं. परंतु मोदींच्या रॅलीच्या जागेपासून ८ किलोमीटरवर हे आंदोलन सुरू होतं. त्यांच्या ताफ्यानं अखेरच्या क्षणी मार्ग बदलल्यानं ही स्थिती निर्माण झाल्याचंही ते म्हणाले.