पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी शेतकरी मेळाव्यासह विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. वाराणसीमध्ये रोड शो वेळी मोदींच्या कारवर चप्पलसारखी काहीतरी वस्तू फेकण्याचा प्रकार घडला. याचा व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागला आहे.
मोदींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुला गर्दी झाली होती. नेहमीप्रमाणे रस्त्यावर लोक येऊ नयेत म्हणून काठ्यांचे कुंपण उभारण्यात आले होते. मोदींचा ताफा तेथून जात होता. यावेळी मोदी या सर्वांना कारमधूनच हात हलवत अभिवादन करत होते. यावेळी गर्दीतून त्यांच्या बुलेटप्रूफ कारच्या काचेवर चप्पलसारखी वस्तू फेकण्यात आली.
या घटनेचा व्हिडीओ आला आहे. मोदींच्या कारवर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाने हे बॉनेटवर पडलेले चप्पलसदृष्य वस्तू उचलून मागे फेकल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. या घटनेप्रकरणी कोणाला ताब्यात घेण्यात आले की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.
उत्तर प्रदेशातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ते चप्पल नव्हते तर तो मोबाईल फोन होता. ही घटना मुद्दामहून केलेली नव्हती, असे सांगितले. परंतू या अधिकाऱ्याने हा मोबाईल मोदींच्या कारच्या काचेवर कसा पडला हे खोलात सांगण्यास नकार दिला. पंतप्रधान गंगा घाटातून केव्ही मंदिराकडे जात असताना ही घटना घडली आहे.