नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,26,62,575 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,66,161 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,754 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,46,116 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी देशातील सद्य परिस्थितीसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी माफी मागावी, अशी मागणी देखील ओवैसी यांनी केली आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पंतप्रधान संसद आणि पत्रकार परिषदांना सामोरे जाण्यास घाबरतात. ते स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू शकतात. मात्र ते रुग्णालयांबद्दल कधीही बोलू शकत नाहीत. ज्यांनी ऑक्सिजन, बेड्स, औषधांच्या कमतरतेमुळे आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांची मोदींनी माफी मागावी" असं ओवैसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच असदुद्दीन ओवेसी यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकार आतापर्यंतचं अवैज्ञानिक सरकार असल्याचं म्हणत ओवेसी यांनी सरकारवर टीका केली आहे.
पहिल्या लाटेनंतर सरकारनं स्वत:च्या विजयाची घोषणा केली आणि स्वत:च स्वत:ला शाबासकीही दिल्याचं ते म्हणाले. "त्यांचे स्वत: सल्लागारच तिसऱ्या लाटेबद्दल गोंधळलेल्या स्थितीत आहेत. सरकारच्या आदेशावर वैद्यानिक आपली स्थिती बदलत आहेत का?," असा सवालही त्यांनी यावेळी केला. ओवेसी यांची ही प्रतिक्रिया केंद्र सरकारचे मुख्य सल्लागार विजय राघवन यांच्या त्या वक्तव्यानंतर आली ज्यात त्यांनी तिसऱ्या लाटेबद्दल शक्यता व्यक्त केली होती.
ओवेसी यांनी ट्विटरद्वारे सर्वोच्च न्यायालयाद्वारे नेमलेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सच्या स्थापनेवरूही निशाणा साधला. "जर सरकार दुसऱ्या लाटेसाठी तयार असतं आणि त्यांचा वागणूक निष्काळजीपणाची नसती तर याची गरज पडली नसती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावरून सरकार घटनात्मक संस्थांचे स्वातंत्र्य कसे खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहे हे दिसून येते. कार्यकारी क्षेत्रात न्यायालयाचा हा एक प्रकारचा हस्तक्षेप आहे," असंही ओवेसी म्हणाले.