नवी दिल्ली: काँग्रेसच्या परदेश विभागाचे अध्यक्ष आणि गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय सॅम पित्रोडा यांच्या वादग्रस्त विधानांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पलटवार केला. पित्रोडांची विधानं अतिशय लज्जास्पद असून काँग्रेसनंपाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा सुरू करण्यास केली आहे, अशा शब्दांमध्ये मोदी बरसले आहेत. पुलवामा हल्ल्यामागे काहीजणांचा हात होता. त्यासाठी संपूर्ण देशाला जबाबदार धरायला नको, असं विधान पित्रोडा यांनी केलं. त्यावरुन मोदींनी पित्रोडा आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या सॅम पित्रोडा यांनी भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राइकवरदेखील प्रश्न उपस्थित केले. 'एअर स्ट्राइक झाला का? जर एअर स्ट्राइक झाला असेल, तर त्यात कितीजण मारले गेले? हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे,' असं पित्रोडा एका मुलाखतीत म्हणाले. यानंतर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली. काँग्रेस पक्षाच्या वतीनं गांधी कुटुंबाच्या सल्लागारांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाचं उद्घाटन केलं आहे, असं ट्विट करत पंतप्रधानांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं. काँग्रेस देशाच्या सैन्यावर प्रश्न उपस्थित करत असल्याचा आरोप मोदींनी केला. 'काँग्रेस दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देऊ शकत नाही, हे काँग्रेसच्या राजघराण्याशी प्रामाणिक असलेल्या व्यक्तीनं मान्य केलं आहे. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर कसं द्यायचं हे काँग्रेसला माहीत नाही. मात्र हा नवा भारत आहे. आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतो,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं. याआधी समाजवादी पार्टीचे नेते रामगोपाल यादव यांनीही पुलवामा हल्ल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. गोपाल यांच्या विधानाचाही मोदींनी समाचार घेतला. विरोधकांना दहशतवादाचं समर्थन करण्याची आणि सुरक्षा दलांना प्रश्न विचारण्याची सवय झाली आहे, अशी टीका मोदींनी केली.