मंदसौर: कोट्यवधी रुपयांची हेराफेरी करुन जामिवावर फिरणारे माय-लेक नोटाबंदी का केली असा आम्हाला विचारतात, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधींना लक्ष्य केलं. तुमचे गैरव्यवहार लोकांसमोर आणण्यासाठीच आम्हाला नोटाबंदी करावी लागली, अशी टीका पंतप्रधानांनी केली. ते मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये बोलत होते. काँग्रेस पक्ष म्हणजे खोटं बोलणाऱ्यांची फौज असल्याची टीका मोदींनी केली. 'खोटं बोलणाऱ्यांची फौज सध्या इतकं खोटं बोलतेय की त्यातही ते संभ्रमात पडतात, असा टोला त्यांनी लगावला. 'दिल्लीतल्या एसी खोलीत बसणाऱ्या लोकांना निवडणुकीचा अंदाज नाही. मध्य प्रदेशातभाजपाचं सरकार आणण्याचा निश्चय जनतेनं केला आहे. माझ्या समोर असलेली गर्दी हेच सांगते,' असं मोदींनी म्हटलं. सरदार वल्लभभाई पटेल खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं नेते होते. जर ते देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, तर शेतकरी उद्ध्वस्त झाला नसता, असं पंतप्रधान म्हणाले. आम्ही सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांना सांगितलं. 'आज देशात खताची समस्या कमी झाली. हे काम भाजपा सरकारनं केलं. काँग्रेसच्या 55 वर्षांच्या सत्ताकाळात जितकं सिंचन झालं, त्यापेक्षा पाचपट सिंचनाचं काम गेल्या 15 वर्षांमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारनं केलं. काँग्रेसनं शेतकऱ्यांना कर्जबाजारी केलं. मात्र आम्ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम केलं,' असा दावादेखील त्यांनी केला.
'जामिनावर बाहेर असलेले माय-लेक नोटाबंदी का केली ते विचारताहेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 8:24 PM