फोडा अन् राज्य करा हे त्यांचं काम; गुजरातमधील हिंसाचारावरून मोदींची काँग्रेसवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 08:59 PM2018-10-10T20:59:05+5:302018-10-10T20:59:24+5:30
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली- गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. फोडा अन् राज्य करा हे काँग्रेसचं काम असल्याचं मोदी म्हणाले आहेत. तर भाजपा सबका साथ सबका विकास या घोषणेनुसार काम करते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मेरा बूथ सबसे मजबूत' या अभियानांतर्गत रायपूर, म्हैसूर, धौलपूर, दमोह आणि आग्रातल्या भाजपा बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी नमो अॅपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
काँग्रेसनं आतापर्यंत फोडा आणि राज्य करा, या नीतीचा अवलंब केला आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांना भडकावण्याचं काम काँग्रेस करत असते. आम्ही सुखाचं वाटप करतो. ते समाजा-समाजाला विभागण्याचं काम करतात. पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे. काँग्रेसचं कामच फोडा आणि राज्य करा, एक दुस-यांमध्ये वाद निर्माण करून देण्याचं असल्याचाही मोदींनी उल्लेख केला आहे.
काय आहे प्रकरण ?
गुजरातच्या साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या चिमुकलीवर एका बिहारी कामगाराने बलात्कार केला होता. त्यानंतर नेहमीच शांत, संयमी असलेल्या गुजरातींचाही राग अनावर झाला. त्यामुळे युपी-बिहारी नागरिकांना गुजरात सोडून देण्याचा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे गुजरातमधील 11 जिल्ह्यांत ही मोहीम तीव्र झाली असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 50 हजार उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याची माहिती आहे.