'PM मोदी टीव्हीवर, रेडिओवर बोलतात, पण सभागृहात बोलत नाही'; मल्लिकार्जुन खरगेंची टीका
By मुकेश चव्हाण | Published: December 21, 2023 11:28 AM2023-12-21T11:28:14+5:302023-12-21T12:39:34+5:30
आज विरोधकांनी संसद परिसर ते विजय चौकतपर्यंत पदयात्रा काढत केंद्र सरकारचा निषेध केला.
नवी दिल्ली: विरोधी पक्षाच्या खासदारांच्या निलंबनावरून संसदेत आज पुन्हा एकदा गदारोळ होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळामुळे १४१ विरोधी खासदारांना उर्वरित हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईविरोधात आज विरोधकांनी संसद परिसर ते विजय चौकतपर्यंत पदयात्रा काढत खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईविरोधात निषेध केला.
खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधी खासदारांनी आंदोलन केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी टीव्हीवर बोलतात, रेडिओवर बोलतात, पण सभागृहात बोलत नाही, अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. तसेच संसदेतील घुसखोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन द्यावं, हीच आमची मागणी असल्याचं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
#WATCH | LoP Rajya Sabha & Congress President Mallikarjun Kharge says, "The PM is speaking everywhere including Varanasi but not in Lok Sabha and Rajya Sabha on (Parliament security breach incident). We condemn it. This is also a (breach of) privilege case due to the violation of… pic.twitter.com/z65dXk3XkP
— ANI (@ANI) December 21, 2023
संसदेच्या दोन्ही सभागृहांतून सोमवारी ७८ खासदारांना निलंबित केल्यानंतर मंगळवारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी लोकसभेतून आणखी ४९ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांतील निलंबित विरोधी खासदारांची एकूण संख्या १४१ वर पोहोचली आहे. निलंबित खासदारांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, काँग्रेस नेते शशी थरूर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आदी खासदारांचा समावेश आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडताना विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे विरोधी पक्षांचे खासदार निराश असल्याचा आरोप केला.
निलंबन कशामुळे?
संसदेतील घुसखोरीप्रकरणावर गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन करावे, या मागणीवर विरोधक ठाम आहेत, दोन्ही सभागृहात दररोज त्यावरून गदारोळ होत असून, अध्यक्ष आणि सभापतीना वारंवार कामकाज स्थगित करावे लागत आहे.
आता शिल्लक किती?
इंडिया आघाडीचे जवळपास दोन तृतीयांश सदस्य निलंबित झाले. लोकसभेत इंडिया आघाडीची संख्या १३८ आहे. त्यापैकी केवळ ४३ खासदार शिल्लक राहिले आहेत. लोकसभेत आता ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधींसह काँग्रेसचे केवळ नऊ सदस्य उरले. तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील २२ पैकी १३, द्रमुकचे २४ पैकी १६, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे तीन खासदार निलंबित झाले. शिवसेना उद्धव सहापैकी एकाही खासदाराचे निलंबन ठाकरे गटाच्या झाले नाही.