संसदेतल्या राड्यात जखमी झालेल्या खासदाराला PM मोदींचा फोन; म्हणाले, "अजिबात घाई करू नका..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:12 IST2024-12-19T15:00:50+5:302024-12-19T15:12:11+5:30
रुग्णालयात दाखल असलेल्या खासदार मुकेश राजपूत यांच्याशी पंतप्रधान मोदींनी फोनवरुन चर्चा केली.

संसदेतल्या राड्यात जखमी झालेल्या खासदाराला PM मोदींचा फोन; म्हणाले, "अजिबात घाई करू नका..."
Parliament Winter Session: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन संसदेतील आणि बाहेरील वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानावरुन संसदेबाहेर धक्काबुक्की झाली. यात भाजपचे दोन खासदार जखमी झाले आहेत. या घटनेत जखमी झालेले प्रताप सारंगी यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर आरोप केला. त्याचवेळी दुसरे खासदार मुकेश राजपूत यांनीही राहुल यांना यासाठी जबाबदार धरले आहे. प्रताप सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची माहिती घेत भाजप खासदारांशी संवाद साधला.
संसदेच्या संकुलात धक्काबुक्की झाल्याच्या आरोपानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपचे खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत या दोन खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दोन्ही खासदारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसरीकडे मकरद्वार येथे भाजप खासदारांनी त्यांना थांबवले आणि त्यांच्याशी बाचाबाची केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. या सगळ्या प्रकरणाची आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दखल घेतली आहे.
रुग्णालयात दाखल असलेल्या मुकेश राजपूत यांच्याशी पंतप्रधान मोदींनी फोनवरुन चर्चा केली. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुकेश राजपूत जखमी अवस्थेत व्हील चेअरवर बसल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्यासाठी त्यांनी फोन हातात घेतला होता. यावेळी आता तुमची तब्येत कशी आहे, अशी विचारणा पंतप्रधान मोदींनी केली. यावर मुकेश राजपूत सांगतात की त्यांची तब्येत ठीक आहे, थोडी चक्कर येत आहे, असे सांगितले. त्यावर पंतप्रधान मोदींनी, अजिबात घाई करू नका आणि पूर्ण उपचार घ्या, असं सांगितले.
भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी सांगितले की, “राहुल गांधींनी माझ्यावर पडलेल्या खासदाराला धक्का दिला आणि त्यानंतर मी खाली पडलो. मी पायऱ्यांजवळ उभा होतो तेव्हा राहुल गांधी आले आणि माझ्यावर पडलेल्या खासदाराला धक्का दिला."