गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोरबीमध्ये असलेला हा पूल गेल्या सहा महिन्यांपासून बंद होता. जवळपास 2 कोटीहून अधिक रक्कम खर्च करून पुलाच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं आहे. त्यानंतर 25 ऑक्टोबरला तो पूल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला होता.
भीषण पूल दुर्घटना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. मोदींनी 2016 मध्ये कोलकाच्या विवेकानंद रोड फ्लायओव्हर दुर्घटनेनंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली आहे. “पूल पडल्याची घटना ‘अॅक्ट ऑफ गॉड’ नाही, तर ‘अॅक्ट ऑफ फ्रॉड’ आहे. हा ‘अॅक्ट ऑफ फ्रॉड’चा परिणाम आहे. निवडणुकीच्या दरम्यान हा पूल पडणं खरं तर ‘अॅक्ट ऑफ गॉड’ आहे. यांनी कसं सरकार चालवलं हे माहित व्हावं, यासाठी हा देवाचा संदेश आहे” असं मोदींनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
“गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपाचं सरकार, हेच तुमच्या विकासाचं मॉडेल आहे का?”
काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी देखील या पूल दुर्घटनेनंतर भाजपावर निशाणा साधला आहे. मोदीजी मोरबीची पूल दुर्घटना ही अॅक्ट ऑफ गॉड आहे की अॅक्ट ऑफ फ्रॉड आहे? सहा महिन्यापासून पुलाची दुरुस्ती केली जात होती. यासाठी किती खर्च आला? पाच दिवसांतच पूल कोसळला. गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपाचं सरकार आहे, हेच तुमच्या विकासाचं मॉडेल आहे का? असा खोचक सवाल दिग्विजय सिंह यांनी विचारला आहे. भाजपा खासदाराच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपा खासदार मोहन कुंदारियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू
मोहन कुंदारिया हे भाजपाचे राजकोटमधील खासदार आहेत. कुंदारिया यांच्या नातेवाईकांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. कुंदरिया यांच्या 12 नातेवाईकांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला असून यामध्ये बहिणीच्या सासरच्या मंडळींचा समावेश आहे. “या पूल दुर्घटनेत मी 5 मुलांसह माझ्या कुटुंबातील 12 सदस्य गमावले आहेत. तसेच, मी माझ्या बहिणीच्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत” असं कुंदारिया यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"