नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचा दौरा केला आहे. १३ आणि १४ डिसेंबरला मोदी वाराणसीत होते. या दरम्यान त्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडरचं उद्घाटन केलं. पंतप्रधान मोदी गंगा आरतीमध्ये सहभागी झाले. मोदींच्या वाराणसी दौऱ्यातील एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.
पंतप्रधान मोदींचा वाराणसी दौरा सुरू असताना एक दिव्यांग महिला त्यांच्या भेटीला आली. मोदींच्या पाया पडण्यासाठी ती पुढे सरसावली. मात्र मोदींनी तिला मध्येच थांबवलं आणि तिचे पाय धरले. पंतप्रधान आपल्या पाया पडत असल्याचं पाहून महिला भावुक झाली. ती हात जोडून उभी राहिली. या महिलेचं नाव शिखा आहे. नमस्कार केल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिखा यांच्याशी संवाद साधला.
मोदी आणि योगी यांच्या भेटीनंतर शिखा यांनी आनंद व्यक्त केला. 'मोदी आणि योगी मला भेटले. त्यामुळे मी खूप खूश आहे. मी मोदींच्या पाया पडण्यासाठी गेले. पण त्यांनी मला थांबवलं आणि ते स्वत:च माझ्या पाया पडले. पंतप्रधानांनी दिलेला सन्मान पाहून मला भरून आलं. मोदी दिव्यांग व्यक्तींची खूप काळजी घेतात,' असं शिखा यांनी सांगितलं.
'त्या' वृद्धासाठी मोदींनी अचानक थांबवली कारपंतप्रधान मोदींच्या वाहनांचा ताफा वाराणसीच्या गल्ल्यांमधून जात असताना मोठी गर्दी जमली होती. मोदींची एक झलक पाहण्यासाठी हजारो जण रस्त्याच्या कडेला उपस्थित होते. रस्त्याचा शेजारी उभ्या असलेल्या एका वृद्धानं मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसपीजींच्या गराड्यातून मोदींपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र एसपीजींनी त्यांना धक्का देऊन मागे सारलं. त्या वृद्धाच्या हातात एक पगडी आणि गमछा होता. त्या वृद्धाला मोदींना पगडी घालायची होती.
एसपीजींनी दोनवेळा वृद्धाला धक्का देऊन मागे ढकललं. हे पाहून मोदींनी कार थांबवली. त्यांनी सुरक्षारक्षकांना इशारा केला आणि वृद्धाकडे पाहिलं. त्यानंतर मोदींनी वृद्धाकडून पगडी आणि गमछा मागितला. मोदींनी वृद्धाला जवळ बोलावलं. कारचा दरवाजा उघडला आणि वृद्धाच्या हातून पगडी घालून घेतली. वृद्धानं मोदींना गळ्यात गमछा घातला. पंतप्रधानांनी हात जोडून त्यांना अभिवादन केलं. त्यानंतर वृद्धानं मोदी मोदी म्हणत घोषणा दिल्या.