नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसंदर्भात कठोर भूमिका घेतल्यानंतर जिनपिंगही काही प्रमाणात नरमल्याचं पाहायला मिळतं आहे. लडाखमधील चीनच्या या हालचाली रोखण्यासाठी मोदींची भूमिका निर्णायक ठरत असल्याची आता चर्चा आहे. भारताकडून कडक संदेश मिळाल्यानंतर आता चीननंही भूमिका बदलली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणाव आणि चिनी माध्यमांमधील आक्रमक वक्तृत्वानंतर चीनने आता सौम्य भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीनला एकमेकांना धोका नसल्याचे भारताचे चिनी राजदूत सुन वेदांग यांनी म्हटले आहे. द्विपक्षीय सहकार्याने दोन्ही देशांमधील मतभेद दूर होतील, अशीही त्यांनी आशा व्यक्त केली आहे.चिनी राजदूत सुन वेदांग यांनी दोन्ही शेजारील देशांना परस्पर संधीची आठवण करून दिली आहे. ते म्हणाले की, सामरिक भागीदारी वाढविण्यासाठी भारत आणि चीनने एकमेकांच्या विकासाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे स्थिर आहे आणि नियंत्रणात आहे. त्यानंतर चीनच्या राजदूताचे हे वक्तव्य समोर आल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. या निवेदनात म्हटले आहे की, भारत-चीन हे दोन्ही देश हा मुद्दा चर्चेच्या माध्यमातून सोडविण्यास सक्षम आहेत.विशेष म्हणजे पूर्व लडाखच्या क्षेत्रात अजूनही परिस्थिती तशीच आहे. येथे चिनी सैन्याने भारताच्या भागात घुसखोरी केली होती. दोन्ही देशांचे कमांडर संपर्कात आहेत. मंगळवारी भारताने स्पष्टपणे सांगितले होते की, एलएसीवरील चिनी सैन्य मागे हटत नाही, तोपर्यंत भारताचे जवानही मागे येणार नसल्याचं भारतानं स्पष्ट केलं होतं. चीनचे राजदूत सुन वेदांग म्हणाले, "आम्हाला एकमेकांच्या मतभेदांकडे योग्य दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे आणि दोन्ही देशांनी द्विपक्षीय सहकार्याच्या मार्गानं प्रश्न सोडवले पाहिजेत. त्याचबरोबर संवादाद्वारे हळूहळू परस्पर मतभेद मिटवायला हवेत. वेदांग म्हणाले की, भारत आणि चीन मैत्रीपूर्ण म्हणून चांगले शेजारी व सहयोगी राहिले पाहिजे.भारत आणि चीनला एकमेकांपासून धोका नाही. राजदूत सुन वेदांग यांनी काही पत्रकार आणि युवकांच्या प्रतिनिधींसमवेत वेबिनारमध्ये म्हटले आहे की, 'ड्रॅगन आणि हत्तीबरोबर एकत्र नृत्य करण्याची वास्तविकता समजून घेणे ही चीन आणि भारत या दोघांसाठी योग्य निवड आहे. याद्वारे दोन्ही देशांचे व त्यांच्या नागरिकांचे मूलभूत हित जपले जातील. दोन मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून चीन आणि भारत यांनी परस्पर सहकार्य मजबूत केले पाहिजे.
CoronaVirus News: ...अन् फडणवीस पुन्हा आले; ठाकरे सरकारच्या 'त्या' दाव्यांची चिरफाड करून गेले
CoronaVirus News: विरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
CoronaVirus News :मोदींच्या भारताकडे कोणी डोळे वटारून पाहू शकत नाही, भाजपाचा राहुल गांधींवर निशाणा
भारत-चीन तणाव वाढला! युद्धाच्या तयारीला वेग द्या; शी जिनपिंग यांचे सेनेला आदेश