नवी दिल्ली : आर्थिक पॅकेजसंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. यात, आज करण्यात आलेल्या घोषणांचा प्रामुख्याने आमच्या शेतकरी बांधवांना आणि स्थलांतरित मजुरांना फायदा होईल, असे मोदी यांनी म्हटले आहे.
मोदींनी ट्विट केले, की 'अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केलेल्या घोषणांचा प्रामुख्याने आपल्या, शेतकरी आणि स्थलांतरित मजुरांना लाभ मिळेल. घोषणांमध्ये प्रगत उपायांची एक श्रृंखला आहे आणि अन्न सुरक्षा, शेतकऱ्यांबरोबरच रस्त्यांवरील विक्रेत्यांनाही याचा फायदा होईल.'
आणखी वाचा - आजचा दिवस शेतकरी अन् प्रवासी मजुरांचा; 'या' आहेत आर्थिक पॅकेजमधील महत्वाच्या घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारीही निर्मला सीतारमण यांच्या घोषणांनंतर ट्वीट केले होते. यात, सरकारने घोषित केलेल्या या आर्थिक पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला उत्तेजन मिळेल. एवढेच नाही, तर या पॅकेजमुळे विशेषत: सूक्ष्म, लघु आणि मध्यंम उद्योगांना मदत मिळेल, असे मोदींनी म्हटले होते.
स्थलांतरित मजुरांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा -अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी, शेतकरी आणि स्थलांतरित मजूर आणि रस्त्यांवरील विक्रित्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. शहरात राहणारे गरीब आणि स्थलांतरित मजुरांसाठी केंद्रातील मोदी सरकारने 11 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. तसेच, स्थलांतरित मजुरांच्या राहण्याची आणि अन्न-पाण्याची योग्य व्यवस्था करावी, असे राज्यांना सांगण्यात आले आहे.
आणखी वाचा - CoronaVirus News : बिल गेट्स यांचा धक्कादायक खुलासा; 2016मध्येच ट्रम्प यांना दिला होता महामारीचा इशारा
8 कोटी स्थलांतरित मजुरांना दोन महिन्यापर्यंत प्रती व्यक्ती पाच किलो मोफत धान्य. तसेच प्रत्येक कुटुंबाला एक किलो चना दाळ दिली जाणार आहे. यासाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच 23 राज्यांतील 67 कोटी लोकांना ‘एक राष्ट्र, एक राशन कार्ड’ योजनेच्या कक्षेत घेण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी 30 हजार कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा -निर्मला सीतारामन यांनी अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी 30 हजार कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा केली आहे. नाबार्डकडून या योजनेतील पैसे जिल्हा बँका आणि ग्रामीण बँकाना दिले जातील. यानंतर या बँकांकडून अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांना पैसे वाटप केले जाणार आहे. या योजनेचा देशातील जवळपास ३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. तसेच याचा समन्वय राज्यसरकार साधतील असं निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. याचसोबत पशुपालक आणि मच्छीमार यांच्यासाठीही योजना लवकरच आणणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा - CoronaVirus News : संशोधकांचा दावा; आणखी 2 वर्षे हाहाकार माजवणार कोरोना, 'या'मुळे होऊ शकणार नही खात्मा