नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमधील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचं व्हर्च्युअली अनावरण केलं. यानंतर मोदींनी जेएनयूच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोदी लाईव्ह येताच विद्यार्थ्यांनी 'जय श्रीराम', 'वंदे मातरम्'च्या घोषणा दिल्या. त्यानंतर मोदींनी तरुणांना 'स्वामी विवेकानंद अमर रहे'च्या घोषणा देण्यास सांगितलं.तरुणांनी देशाला प्रगतीकडे न्यावं ही स्वामी विवेकानंदांचं स्वप्न होतं. स्वामीजींचा पुतळा त्यासाठी तरुणांना प्रेरणा देईल. भारत सशक्त-समृद्ध व्हावा, अशी स्वामीजींची इच्छा होती. त्यांचं ते स्वप्न साकार करण्यासाठी हा पुतळा तरुणांना प्रोत्साहित करेल. देशावर सर्वाधिक प्रेम करा, हा स्वामीजींचा सर्वोच्च संदेश होता. जेएनयूच्या प्रांगणात असलेला स्वामीजींचा पुतळा तोच संदेश तरुणांना देईल. यामुळे एकतेची भावना वाढीस लागेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.जेएनयूमध्ये डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. विद्यापीठात होत असलेल्या निवडणुकांवरही डाव्या संघटनांचा वरचष्मा राहिलेला आहे. विद्यापीठात अनेकदा डाव्या संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात वादही झाले आहेत. यावर मोदींनी अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. 'राष्ट्रहितापेक्षा विचारधारा महत्त्वाची नसते,' असं मोदी म्हणाले. जेएनयूमधील स्वामीजींचा पुतळा सर्वांना प्रेरणा आणि ऊर्जा देईल. प्रत्येक व्यक्ती साहसी असावी, असं स्वामीजींना वाटायचं. स्वामींच्या पुतळ्यातून ते साहस आपण शिकावं. स्वामीजींकडून आपण करुणाभाव शिकावा, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.