मदुराई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडुतील मदुराई दौऱ्यावर जात आहेत. येथे ऑल इंडिया इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सच्या (AIIMS) इमारतीच्या पायाभरणीचा शुभारंभ करण्यासाठी मोदी थोप्पुरला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्विटवर गो बॅक मोदी #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. हजारो नेटीझन्सकडून ट्विटवरुन मोदींविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे.
तामिळनाडूतील मोदींच्या दौऱ्याला काही स्थानिक नागरिक, विरोधी पक्षातील पुढारी आणि डाव्या पक्षांचा विरोध आहे. त्यामुळे, मोदींना ट्विटरवरुनच गो बॅक असे सांगण्यात येत आहे. ट्विटरवर गेल्या 12 तासांपासून #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. थुटुकुंडी येथील पोलिसांचा गोळीबार, गाजा रिलिफ फंड याबाबत मोदींना प्रश्न विचारण्यात येत आहेत. शनिवारी सायंकाळी या ट्रेंडला सुरुवात झाली असून रविवारी सकाळी 9.30 वाजेपर्यंत 2.50 लाख ट्विपल्सने हा हॅशटॅग ठेऊन मोदींच्या दौऱ्याला आपला विरोध दर्शवला आहे. यापूर्वीही एप्रिल 2018 मध्ये मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर असताना अशाचा विरोधाचा सामना मोदींना करावा लागला होता. त्यावेळीही विरोधकर्ते काळे झेंडे घेऊन मोदींविरोधात रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, गो बॅक मोदी हा हॅशटॅग ट्रेंड झाल्यानंतर, मोदी समर्थकांनीही #TNWelcomesModi असा ट्रेंड ट्विटरवर सुरू केला असून तोही #GoBackModi च्या खालोखाल ट्रेंड करत आहे.