केरळमधील वायनाड जिल्ह्यातील भूस्खलन झालेल्या ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. त्यांनी चुरलमला येथे जाऊन आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. पीएम मोदी कन्नूर विमानतळावरून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने वायनाडला पोहोचले. ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या चुरलमला परिसरात नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे भूस्खलनग्रस्त चुरलमाला, मुंडक्काई आणि पंचिरिमट्टमचे हवाई पाहणी केली होती.
"मी कधीच असं सांगितलं..."; परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई पाहणीनंतर पीएम मोदींचे हेलिकॉप्टर कलपेट्टा येथील एसकेएमजे विद्यालयात उतरले. येथून ते रस्त्याने चुरलमला येथे रवाना झाले. चुरलमला येथे, आपत्तीनंतर मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी लष्कराने १९० फूट लांबीचा बेली ब्रिज बांधला आहे. नुकसानीचा आढावा घेताना मोदी या पुलावरून पायी गेले. पीएम मोदींनी बचाव कर्मचारी, राज्याचे मुख्य सचिव व्ही वेणू आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि केंद्रीय पर्यटन आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी हेही त्यांच्यासोबत होते. अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी,हवाई सर्वेक्षणादरम्यान त्यांना भूस्खलनाचा केंद्रबिंदू सापडला, जो इरुवाझिंजी पुझा (नदी) च्या उगमस्थानी आहे. त्यांनी पुनचिरीमट्टम, मुंडक्काई आणि चुरलमाला या सर्वात जास्त प्रभावित क्षेत्रांचा आढावा घेतला.
केरळमधील वायनाड जिल्ह्यात ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात २२६ लोकांचा मृत्यू झाला होता. या परिसरात अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत.
वायनाड दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० जुलै रोजी बैठक घेऊन आढावा घेतला होता. त्यांनी एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल आणि नौदलाला मदत आणि बचाव कार्यात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या होत्या. लष्कर आणि केंद्रीय दलाच्या तिन्ही सेवांचे तसेच अग्निशमन दल आणि नागरी संरक्षणाचे १२०० हून अधिक जवान घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात होते. केंद्राने या भागाला भेट देण्यासाठी एक आंतर-मंत्रालयीन पथकही पाठवले आहे, हे ८ ऑगस्टपासून भेट देत आहे आणि बाधित भागातील नुकसानीचा आढावा घेत आहे.