नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ओडिशातील भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या ओबीसी जातीच्या विधानावर आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी जातीत जन्मला आले नाही तर ते जनरल कॅटेगिरीत जन्मले आहेत. परंतु भाजपाचे लोक पंतप्रधान ओबीसीत जन्मले असं सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत असा दावा राहुल गांधींनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, लोकांना फसवलं जात आहे. नरेंद्र मोदी ओबीसीत जन्माले आले नाहीत. ते तेली समाजाचे आहेत. भाजपाने २००० मध्ये त्यांच्या जातीला ओबीसी बनवलं. ते जनरल कॅटेगिरीतच जन्मले. मोदी ओबीसीत जन्मले हे जगाला खोटं सांगत आहेत. ते ओबीसी नाहीत हे मला माहिती आहे. ते कुठल्याही ओबीसीची गळाभेट घेत नाहीत. ते जातगणना करत नाहीत कारण ते ओबीसी नाहीत. कोट्यवधीचा सूट घालतात आणि स्वत:ला गरीब, फकीर सांगता. रोज सकाळ, संध्याकाळ नवा ड्रेस घालतात आणि स्वत:ला ओबीसी बोलतात असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत मला जन्म प्रमाणपत्राची गरज नाही कारण मला ते माहिती आहे. मोदी कुठल्याही शेतकरी, कामगाराचा हात पकडत नाहीत. केवळ अदानींचा हात पकडतात. त्यामुळे ते पूर्ण आयुष्यात जातीनिहाय जनगणना करणार नाहीत. जातनिहाय जनगणना केवळ काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींच करून दाखवतील असा विश्वास राहुल गांधींनी जनतेसमोर व्यक्त केला.
काय म्हणतात नरेंद्र मोदी?
काँग्रेस मोदी सरकारमध्ये किती ओबीसी नेते आहेत असं विचारते, मात्र काँग्रेस आणि यूपीए सरकारने ओबीसींवर अन्याय केला. ओबीसी नेत्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. मागासवर्गीयांमधून येणाऱ्या कर्पूरी ठाकूर यांच्यासोबत काँग्रेसनं कसा व्यवहार केला? काँग्रेसला माझ्यासारखा ओबीसी दिसत नाही का? असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला होता.