PM Modi Kerala Visit : काही दिवसांपूर्वीच केरळच्यावायनाडमध्येभूस्खलनाची घटना घडली. त्या घटनेत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, शेकडो घरेही जमीनदोस्त झाली आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी वायनाडचा दौऱ्यावर जाणार असून, भूस्खलनग्रस्त भागाला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी या परिसराचे हवाई सर्वेक्षण करतील.
सविस्तर माहिती अशी की, 30 जुलै 2024 रोजी केरळमधील वायनाड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले. या घटनेत 420 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे, तर 150 लोक बेपत्ता आहेत. याशिवाय, किमान 273 जखमी झाले. तसेच, शेकडो घरे जमीनदोस्त झाल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्या घटनेनंतर बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी लष्कर, एसओजी अधिकारी आणि वन अधिकाऱ्यांचे विशेष पथक बचाव मोहीम राबवत आहे.
दरम्यान, दहा दिवसांच्या बचाव मोहिमेनंतर भारतीय लष्कर एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि केरळ पोलिसांकडे बचाव कार्य सोपवून लवकरच वायनाडहून परतणार आहे. इस्रोच्या विश्लेषणानुसार, या भूस्खलनाने 86,000 चौरस मीटर क्षेत्रफळ व्यापले आहे.
सीएम विजयन यांची केंद्र सरकारला विनंतीया घटनेनंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केंद्र सरकारला ही आपत्ती राष्ट्रीय आणीबाणी आणि गंभीर आपत्ती म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याला पुनर्वसनासाठी केंद्राकडून मदतीची अपेक्षा आहे. या संदर्भात केंद्र सरकारने अहवाल सादर करण्यासाठी नऊ सदस्यीय समितीही नेमली आहे. आम्हाला आशा आहे की, पंतप्रधान परिस्थिती स्पष्टपणे समजून घेऊन योग्य तो निर्णय घेतील.