"नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल", अमित शाहांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 11:38 PM2023-05-25T23:38:45+5:302023-05-25T23:39:29+5:30
काँग्रेस सध्याच्या जागांपेक्षा कमी आकडा गाठेल, असा दावाही अमित शाह यांनी केला.
गुवाहाटी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, काँग्रेस सध्याच्या जागांपेक्षा कमी आकडा गाठेल, असा दावाही अमित शाह यांनी केला. गुरुवारी अमित शाह यांनी गुवाहाटीमध्ये 44 हजार 703 तरुणांना नोकरीचे नियुक्ती पत्र दिले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
अमित शाह यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस अत्यंत नकारात्मक वृत्तीचे राजकारण करत आहे. या नकारात्मक वृत्तीने काँग्रेस नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजप संपूर्ण देशात 300 हून अधिक जागा जिंकेल आणि काँग्रेस विरोधी पक्षाचा दर्जाही गमावेल, असे म्हणत अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
अमित शाह म्हणाले की, नकारात्मक राजकारणामुळे काँग्रेस नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी सबब पुढे करत बहिष्कार टाकत आहे. मात्र, काँग्रेस आणि विरोधी शासित राज्यांमध्ये अशी अशी उदाहरणे समोर आली आहेत, जिथे राज्यपालांशिवाय संबंधित मुख्यमंत्री, काँग्रेस नेते जसे की सोनिया गांधी-राहुल गांधी यांसारख्या नेत्यांनी नवीन विधानसभांचे उद्घाटन केले आहे.
याचबरोबर, अमित शाह यांनी आसामच्या मागील सरकारांवरही निशाणा साधला. ज्या आसाममध्ये पूर्वी कर्फ्यू अनेक महिने लागू होता आणि गोळीबाराच्या घटना घडत होत्या, त्याच आसाममध्ये आता विकासाची चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे विकासाचे नवे पर्व सुरू केले आहे, असे अमित शाह म्हणाले.
दरम्यान, नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाला बहुतांश विरोधी पक्ष विरोध करत आहेत. संसदेच्या नवीन भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. काँग्रेससह जवळपास 20 विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे.