विकास झाडे नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझी मंगळवारी दीर्घ चर्चा झाली. दिल्ली विकासासाठी असलेल्या संकल्पना त्यांना अवगत केल्यात. त्यांनी माझं सगळं म्हणणं ऐकूण घेतलं. पाच मिनिटांची सदिच्छा भेट होती, ती ४० मिनिटं चालली. त्यांनीही मला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. एवढंच नव्हे तर पुढं कोणतीही अडचण आली, तर मला थेट भेटण्याचा सल्ला दिला. त्यामुळं पुढील पाच वर्षात केंद्राच्या मदतीनं दिल्लीचा विकास झपाट्यानं होणार, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याबद्दल ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी केजरीवाल यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. दिल्ली आणि देशातील राजकारणावर केजरीवाल यांनी दर्डा यांच्याशी तब्बल तासभर चर्चा केली. विजय दर्डा यांच्या या सदिच्छांचा स्वीकार करीत केजरीवाल म्हणाले, मागच्या माझ्या कार्यकाळात मला शेवटच्या एक वर्षातच काम करता आलं. आधीची चार वर्षे हक्काची लढाई लढण्यात गेले. आता आम्ही बदललो आहोत. विकास हाच एकमेव संकल्प आहे. वीज, पाणी, मोहल्ला क्लिनिक, महिलांना मोफत प्रवास, सर्वोत्तम शाळा आदी कामं ही आमची बलस्थान ठरलीत. त्यामुळंच दिल्लीकरांनी विश्वास ठेवत २०१५ चं प्रेम पुन्हा दिलं. मला समाधान याचं आहे की, अन्य राज्यातही मी राबविलेल्या योजना लागू व्हाव्यात म्हणून आग्रह धरला जातो. पंजाब, हरयाणा, महाराष्टÑ आदी राज्य सरकारांनी दिल्लीच्या अनेक योजनांचं अनुकरण केलं आहे. देशभर अशीच जनहिताची कामं व्हावीत.केजरीवाल म्हणाले, तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाच मी निश्चय केला होता की, मला पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारसोबत मिळून काम करायचं आहे. मला तक्रारी करायच्यानाहीत, तर लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नगरविकासमंत्री हरदीपसिंह पुरी आदींची सदिच्छा भेट घेतली. या सगळ्यांनीच सोबत काम करण्याच्या माझ्या संकल्पाचे स्वागत केले आहे.>गडकरींसारखे नेते हवेतदेशाचा विकास करायचा असेल, तर नितीन गडकरी यांच्यासारखे ‘विकासपुरुष’ हवेत. त्यांच्या कामात राजकारण नसतं, हे मी जाणलं. त्यांनी मला सातत्यानं सहकार्य केलं. माझ्या कामामुळं तेही प्रभावित झाले आहेत. त्यामुळंच आमची चांगली मैत्री झाली आहे. असंच सहकार्य मोदी-शहा दिल्लीच्या विकासाबाबत करतील, अशी भावना केजरीवाल यांनी व्यक्त केली....तर देशभर जाणारदेशातील जनतेनं मला खूप प्रेम दिलं आहे. सकारात्मक प्रतिसाद मिळतो. नि:स्वार्थ भावनेनं संघर्षातून आम्ही विजय मिळविला आहे. उत्तम भारत घडविण्यासाठी आम्ही ‘राष्टÑनिर्माण’चा संकल्प केला आहे. देशभरातील कोट्यवधी लोक या अभियानात सहभागी होतील. त्यातूनच आम आदमीपार्टीचं संघटन मजबूत होईल, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी मला सहकार्य करणार - केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 3:43 AM