नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. 2020 या वर्षात कोरोनाने थैमान घातले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हजारो तरुणांची नोकरी गेली आहे. काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान 2020 ला निरोप देत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे. नवीन वर्ष सर्वांसाठी सुखाचं, आनंदाचं असेल अशी आशा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नव्या वर्षाचं स्वागत होत असताना पंतप्रधान मोदींनी एक कविता लिहिली आहे. "अभी तो सूरज उगा है" या कवितेच्या माध्यमातून त्यांनी संकटांवर मात करत पुढे गेल्यानंतर प्रकाशाचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. नरेंद्र मोदींनी लिहिलेली ही कविता @MyGovIndia या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही कविता लिहिण्याबरोबरच मोदींनी आपला आवाज देखील दिला आहे.
मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देशातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "आपणा सर्वांस 2021 च्या शुभेच्छा. हे वर्ष आमच्यासाठी चांगले आरोग्य, आनंद आणि समृद्धी घेऊन येईल. आशा आणि कल्याणाची भावना प्रबळ होवो" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. नव्या वर्षाच्या स्वागताबाबतचे कार्यक्रम लक्षात घेऊन देशातील अनेक राज्यांमध्ये नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटात लोकांनी गर्दी करू नये हा यामागील उद्देश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नव्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाच्या प्रसाराबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. देशात कोरोना व्हायरसचा ग्राफ वेगानं खाली येत आहे. कोरोनाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे की, नवीन वर्षाकडे जाताना कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. डिसेंबर 2020 मध्ये पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत कोरोनाचे सगळ्यात कमी रुग्ण समोर आले आहेत. डिसेंबरमध्ये 50 टक्के कोरोना रुग्णांमध्ये घट आढळून आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये कोरोना संक्रमणाच्या स्थितीत सुधारणा दिसून येत आहे.