नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 7 वर्षांपासून मन की बात कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधला. या माध्यमातून देशभरातील खेड्या-पाड्यापर्यंत पोहोचण्याचा, तेथील नागरिकांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींनी अनेकदा केला आहे. मोदींच्या या कार्यक्रमासंदर्भात बोलताना, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोदींचं कौतुक केलं आहे. तसेच, मोदींचा मन की बात कार्यक्रम राजकारण विरहीत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
संसदेचं हिवाळी अधिवेशन आज २९ नोव्हेंबरपासून सुरू होत असून पहिल्या दिवशी तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबतचे विधेयक केंद्र सरकार लोकसभेत मांडणार आहे. कृषी कायदे, पेगॅसस, इंधन दरवाढ, चीनसोबतचा तणाव अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक केंद्र सरकारला धारेवर धरणार असल्याने हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिवेशनासंदर्भात भाष्य केलं. हिवाळी अधिवेशनात सर्वात जास्त चर्चा झाली, असं कौतुक व्हावं, असे मोदी म्हणाले. तसेच, हे अधिवेशन किती वेळा तहकूब करण्यात आलं, अनेकदा गोंधळ झाला, यासाठी या अधिवेशनाची चर्चा होऊ नये, असे म्हणत मोदींनी विरोधकांना टोलाही लगावला. दरम्यान, अधिवेशनपूर्वी बोलताना भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोदींचं कौतुक केलंय.
'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 7 वर्षात कधीही मन की बात या कार्यक्रमाचा वापर आपल्या राजकीय लाभासाठी केला नाही,' असे जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे.
मला सत्तेत नाही, सेवेत राहायचं आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी रविवारी 'मन की बात'(Mann Ki Baat) कार्यक्रमात देशाला संबोधित केले. मन की बातचा हा 83वा भाग होता. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन आणि मोबाईल अॅपवर प्रसारित करण्यात आला. यावेळी पीएम मोदींनी आयुष्मान योजनेपासून स्टार्टअप आणि पर्यावरणापर्यंत चर्चा केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी हुतात्म्यांना अभिवादन केले. तसेच, मला सत्तेत नाही तर सेवेत रहायचे आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.