पंतप्रधान मोदी यांची घटिका आता भरत आली - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 05:26 IST2019-05-09T05:25:43+5:302019-05-09T05:26:14+5:30
केंद्रातील सरकार बदलण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटिका भरत आली असल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

पंतप्रधान मोदी यांची घटिका आता भरत आली - राहुल गांधी
नवी दिल्ली - केंद्रातील सरकार बदलण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटिका भरत आली असल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.
राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसने जाहीर केलेली न्याय योजना पसंत पडल्याने युवक तसेच ज्येष्ठ नागरिकही लोकसभा निवडणुकांत आम्हालाच मतदान करत आहेत. देशातील गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी न्याय योजना अतिशय परिणामकारक ठरणार असल्याचे त्यांना मनोमन पटले आहे.
देशातील सर्वात गरीब कुटुंबांना दरवर्षी ७२ हजार रुपयांचे किमान हमी उत्पन्न देण्याचे आश्वासन काँग्रेस पक्षाने आपल्या न्याय योजनेच्या माध्यमातून दिले आहे. ‘अब होगा न्याय’, असे घोषवाक्य असलेली प्रचारमोहीम लोकसभा निवडणुकांत या पक्षाने गेल्या महिन्यापासून राबविली आहे.
‘चौकीदार चोर है' विषयी
भिंड : ‘चौकीदार चोर है' ही घोषणा मी किंवा काँग्रेसने तयार केलेली नाही. युवक, शेतकरी, मजूर यांनीच मोदी सरकारची खिल्ली उडविण्यासाठी ही घोषणा तयार केली आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. जाहीर सभेत त्यांनी चौकीदार चोर है या घोषणेचा उगम कसा झाला याचा किस्सा सांगितला. दोन कोटी रोजगार निर्माण करीन, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार अशी आश्वासने चौकीदाराने (नरेंद्र मोदी) दिल्याचा उल्लेख आपण छत्तीसगडमधील सभेत करताच श्रोत्यांपैकी दहा-पंधरा युवकांनी ‘चौर है' असा प्रतिसाद दिला. ते काय म्हणाले हे पहिल्यांदा नीट ऐकू न आल्याने आपण पुन्हा विचारले असता ते युवक जोरात म्हणाले की ‘चौकीदार चोर है'. त्यानंतर ही घोषणा जनमानसात पसरली.