राजस्थानातील भीलवाडामध्ये गुर्जर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या मालासेरी डूंगरी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लिफाफा आज उघडण्यात आला. या लिफाफ्यात 21 रुपये निघाले आहेत. यात 20 रुपयांची नोट आणि एक नाणे निघाले आहे. पंतप्रधानांच्या या लिफाफ्यासंदर्भात सर्वानाच मोठी उत्सुकता होती. पंतप्रधान मोदींनी मंदिराला दानाच्या स्वरुपात किती रुपये दिले? यासंदर्भात गेल्या आठ महिन्यांपासून सर्वांच्याच मनात प्रश्न होता? याचे उत्तर आता सर्वांना मिळाले आहे.
माध्यमांतील माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच वर्षाच्या जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील असींद तालुक्यातील मालासेरी डूंगरी येथे गेले होते. त्यांनी येथे पूजाही केली होती. तसेच, मंदिराच्या दान पेटीत एक लिफाफाही टाकला होता. त्यांच्या या लिफाफ्यासंदर्भात सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, मंदिराच्या नियमानुसार दान पेटी वर्षातून केवळ एकदाच उघडली जाते. यामुळे नुकतीच ही दान पेटी उघडण्यात आली. या दान पेटीत जवळपास 19 लाख रुपये जमा झाले आहेत.
या दान पेटीत तीन लिफाफे मिळाले आहेत. मंदिरातील पुजाऱ्यांनी दावा केला आहे की, हे तीनही लिफाफे वेगवेगळ्या रंगाचे आहेत. यांतील पंतप्रधान मोदींचा लिफाफा पांढऱ्या रंगाचा आहे. पुजाऱ्यांनी हा लिफाफा सर्वांसमोर खुला केला. याचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड करण्यात आला आहे. या लिफाफ्यात काय असणार याची उत्सुकता सर्वांनाच होती.
यासंदर्भात बोलताना पुजारी हेमराज पोसवाल यांनी सांगितले की, व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी पांढऱ्या रंगाचा लिफाफा टाकताना दिसून आले आहेत. यावरूनच, हा लिफाफा पंतप्रधान मोदींनीच टाकल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. याशिवाय उरलेल्या दोन लिफाफ्यांमध्ये प्रत्येकी 101 रुपये आणि 2100 रुपये मिळाले आहेत.