नवी दिल्ली: पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक होत आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी जय्यत तयारी करत आहेत. तत्पूर्वी एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हा फोटो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री योगीं आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवून चर्चा करताना दिसत आहेत. स्वतः योगी यांनी एका कवितेसह हे फोटो ट्विट केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 56व्या DGP IGP परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तीन दिवसांच्या लखनऊ दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान सीएम योगींनी शेअर केलेला फोटो बरचं काही बोलून जातोय. या नेत्यांमधील मजबूत संबंध दाखवण्यासाठी दोन्ही फोटो पुरेशी आहेत. सीएम योगींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत.
पंतप्रधान राजभवनाच्या कॉरिडॉरमध्ये मुख्यमंत्री योगींच्या खांद्यावर हात ठेवून फिरताना आणि सखोल चर्चा करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी हे फोटो शेअर करत एक कविता लिहिली असून त्याद्वारे त्यांनी आपले मतही मांडले आहे. त्यांनी लिहिलं- ‘हम निकल पड़े हैं प्रण करके, अपना तन-मन अर्पण करके, जिद है एक सूर्य उगाना है, अम्बर से ऊंचा जाना है, एक भारत नया बनाना है.’